द्राक्षाच्या काळजीनं घेतला त्याचा बळी

द्राक्षाच्या काळजीनं घेतला त्याचा बळी

सांगली - त्याच्या द्राक्ष बागेवर दावण्या आला होता... देठातून डोकावलेले छोटे-छोटे घड वाया जातील म्हणून तो घाबरला होता... त्याला मधुमेह होता अन्‌ रक्तदाबही... आराजांशी झगडत तो निसर्गाशी दोन हात करत होता... कुटुंबातील एकमेव कर्ता म्हणून लढत होता... पण, द्राक्षावरील दावण्यानं हतबल झाला.  स्वतःचे आजार विसरून शेतात लढायला उतरला... दुर्दैवाने त्यातच त्याचा बळी गेला. दादासाहेब तात्यासाहेब चौगुले (वय ३८, रा. मल्लेवाडी, ता. मिरज) या शेतकऱ्याची करुण कहाणी डोळ्यात पाणी आणणारी आहे. 

मल्लेवाडीच्या आडओढ्याकाठी शुक्रवारी रात्री दादासाहेबावर अंत्यसंस्कार झाले. एका शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत पाहून सारेच हळहळत होते. पहाटे उठून आपला बाप शेतात गेला होता... तो संध्याकाळी परतणार आहे, असे समजून त्याच्या दोन्ही मुली, मुलगा शाळेत गेले होते. दोन दिवस शाळा आणि मग दिवाळीची सुटी म्हणून खुशीत होती... पण, त्यांच्यासाठी ही दिवाळी काळरात्र ठरली. त्यांचा बाप परतलाच नाही... लहरी निसर्गानं मांडून ठेवलेल्या फेऱ्यात अडकून कायमचा सोडून गेला. या कुटुंबावर आभाळ कोसळलंय.

दादासाहेब चौगुले अतिशय सकारात्मक विचारसरणीचा लढाऊ शेतकरी. तीनपैकी दीड एकरावर द्राक्षाची बाग. वयस्कर वडील, पत्नी, दोन मुली, छोटा मुलगा असं कुटुंब. भरपूर राबायची तयारी. गेल्या महिनाभरात जोरदार पावसानं समाधान होतं. २८ सप्टेंबरला फळ छाटणी घेतली होती. छोट्या पानांआडून घडही डोकावू लागले होते. पहाटे धुकं, दहाला उन्ह, दुपारी पाऊस, पुन्हा उन्ह आणि रात्री धो-धो पाऊस... निसर्गाच्या या विचित्र चक्रानं भल्याभल्या माणसांना घाईला  आणलंय. 

द्राक्षावर रोगांचा घाला येणार हे ठरलेलं. त्याच फेऱ्यात दादासाहेबाची बाग अडकली. दावण्या दिसू लागल्यानं तो घाबरला. औषध घेतलं, पंपात भरलं आणि गड्याने बागेवर फवारणी सुरू केली. त्याला ना जेवण-खाण्याची फिकीर होती, ना आजारांची. त्यात जहरी औषधाचा फवारा... तो श्‍वासाद्वारे शरीरात पसरला अन्‌ चक्कर येऊन तो कोसळला. दुचाकीवरून त्याला दवाखान्यात न्यायला मित्र सरसावले, मात्र गाडीवरच त्याला हृदयविकाराच्या तीव्र धक्का आला. तो कोसळला. निसर्गाशी लढत तो कुटुंब उभे करू पाहत होता, मात्र त्याची लढाई अधुरी राहिली. तोही कोसळला अन्‌ त्याचं कुटुंबही. 

रिपोर्ट नाही, परिस्थिती पाहा
वैद्यकीय अहवालानुसार दादासाहेब चौगुले याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने झाला. सरकारने केवळ तो रिपोर्ट पाहू नये तर ज्या स्थितीत त्याचा मृत्यू झाला, त्याचीही दखल घ्यावी, अशी भावना या भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत. मोडून पडलेल्या त्याच्या कुटुंबाला आधार द्यावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com