द्राक्ष-बेदाणा प्रदर्शन उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

तासगाव - देशात आणि परदेशात सांगली जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या द्राक्षे आणि बेदाणा क्षेत्रातील शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा ‘द्राक्ष-बेदाणा प्रदर्शन २०१८’ची तयारी पूर्णत्वाच्या मार्गावर असून, चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात नामवंत कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

तासगाव - देशात आणि परदेशात सांगली जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या द्राक्षे आणि बेदाणा क्षेत्रातील शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा ‘द्राक्ष-बेदाणा प्रदर्शन २०१८’ची तयारी पूर्णत्वाच्या मार्गावर असून, चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात नामवंत कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

द्राक्ष आणि बेदाण्यांच्या विविध प्रकारांचे प्रदर्शनही या वेळी भरविण्यात येणार आहे. २५ ते २८ जानेवारीदरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या या द्राक्ष-बेदाणा प्रदर्शनासाठी तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि डिपिंग ऑईलमधील वेस्ट कोस्ट हर्बोकेम लि. हे मुख्य प्रायोजक, अग्रणी प्लास्टिक प्रा. लि., द्राक्षबागांसाठी व बेदाणा निर्मितीसाठी अवजारे निर्मिती करणारे ‘युनिमेक सिस्टिम्स’सह प्रायोजक आहेत. तासगाव बाजार समितीच्या आवारात बेदाणा सेल हॉलमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. 

द्राक्षविषयक व्याख्याने 

  • शुक्रवारी (ता. २६) प्रसिद्ध द्राक्षतज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे यांचे ‘द्राक्षबागेचे जमीन व्यवस्थापन’ या विषयावरील व्याख्यान दुपारी तीनला होणार आहे.

  • शनिवारी (ता. २७) ज्येष्ठ कृषी संशोधक डॉ. आर. डी. रावळ (बंगळूर) यांचे ‘द्राक्षबागेतील कीटकनाशक व बुरशीनाशकांचे व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

स्थळ - प्रदर्शनाचे ठिकाण.

नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या बेदाणा व द्राक्ष प्रदर्शनासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यात बेदाणा कलर सॉर्टर मशिन्स, बेदाणा डिपिंग ऑईल, दर्जेदार औषध कंपन्या, खतनिर्मिती कंपन्या, सूक्ष्म अन्नद्रव्ये व संजीवके बनविणाऱ्या कंपन्या, द्राक्ष बागेसाठी उपयुक्‍त ठरणारे शेततळ्यांमधील कागद, बेदाणा तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टिकचे क्रेट, मासा जाळी, शेडनेट, प्लास्टिक ताडपत्री, ठिबक सिंचन, ट्रॅक्‍टर्स, पॅकिंग मटेरिअल, पंप ब्लोअर्स बनविणाऱ्या कंपन्यांकडून स्टॉल बुकिंग सुरू आहे.

काही आंतरराष्ट्रीय कंपन्याही या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य अशा बेदाणा सेल हॉलमध्ये प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, २५ जानेवारीला दुपारी तीनला प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. 

तासगाव ही द्राक्षपंढरी आहे; तर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही देशातील प्रथम क्रमांकाची बाजारपेठ आहे. या पार्श्‍वभूमीवर सांगली व सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटकातील विजापूर, बागलकोटपर्यंत वाढत असलेल्या या द्राक्ष शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन नवे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे ठरणार आहे. संपर्क - अजित ः ९८२२०९०८२२, परितोष - ९७६६२१३००३, रवींद्र - ९७६३७२३०८८. 

Web Title: Sangli News Grape raisin exhibition