जीएसटीने "स्वस्थ भारत' झाला महाग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

सांगली  - "स्वच्छ भारत, स्वस्थ भारत'चा केंद्र सरकारचा नारा वस्तू व सेवा कर लागू करताना मात्र "स्वस्थ'ला धक्का देणारा ठरतोय. क्रीडा आणि व्यायाम साहित्यावरील करवाढीने या क्षेत्रातील वितरकांसह सर्व खेळाडूंनी संताप व्यक्त केला आहे. लोकप्रिय क्रिकेटपासून ते ऑलिंपिकमध्ये पदकाची अपेक्षा असणाऱ्या मैदानी खेळापर्यंत महागाईचा झटका बसला आहे. "स्वस्थ भारत' महाग झाला, अशी भावना लोक व्यक्त करत आहेत. 

सांगली  - "स्वच्छ भारत, स्वस्थ भारत'चा केंद्र सरकारचा नारा वस्तू व सेवा कर लागू करताना मात्र "स्वस्थ'ला धक्का देणारा ठरतोय. क्रीडा आणि व्यायाम साहित्यावरील करवाढीने या क्षेत्रातील वितरकांसह सर्व खेळाडूंनी संताप व्यक्त केला आहे. लोकप्रिय क्रिकेटपासून ते ऑलिंपिकमध्ये पदकाची अपेक्षा असणाऱ्या मैदानी खेळापर्यंत महागाईचा झटका बसला आहे. "स्वस्थ भारत' महाग झाला, अशी भावना लोक व्यक्त करत आहेत. 

क्रीडा साहित्यावर आधी 6 टक्के कर होता. तो आता दुप्पट म्हणजे 12 टक्के करण्यात आला आहे. काही वस्तू 18 टक्के तर काही 28 टक्के झाल्या आहेत. व्यायामाच्या साहित्यावर तब्बल 28 टक्के कर आकारणी करण्यात आली आहे. याविरुद्ध देशपातळीवरील क्रीडा संघटना, क्रीडा साहित्य निर्माते व वितरकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांची भेट घेतली. त्यांनी आश्‍वस्त केले असले तरी बदल होतील का, याविषयी शंका व्यक्त होत आहे. 

* क्रिकेट बॅट (इंग्लिश विलो) - किंमत 3 हजार, वाढ - 500 ते 1000; काश्‍मीर विलो किंमत वाढ - 150 ते 200 रुपये 
* क्रिकेट बॅट (टेनिस बॉल) - किंमत 300 ते 2000. वाढ - 50 ते 200 रुपये. 
* क्रिकेट बॉल - किंमत 100 पासून, वाढ 6 ते 18 रुपये 
* बॅट, ग्लोव्हज, किपर ग्लोव्हज, हेल्मेट दरात 6 टक्के प्रमाणे वाढ. 
* फूटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल - 6 टक्‍क्‍यांवरून 12 टक्के 

* या बॉलच्या कमाल विक्री किमतीत (एमआरपी) आणि वितरक किमतीत कंपन्यांनी बदल केलेला नाही. त्यामुळे 500 रुपये एमआरपीचा बॉल आधी 400 रुपयांना दिला जायचा. आता तो 450 ला विकला जाईल. छपाई तीच, पण किंमत 50 ने वाढणार आहे. 

मैदानी खेळांना झटका 
* खेळांसाठीचे कपडे - 6 टक्‍क्‍यांवरून 12 टक्के. 500 रुपयांच्या आतील - 5 टक्के 
* खेळाचे बूट - 13 टक्के वरून 18 टक्के. (500 रुपयांवर किमतीसाठी) 
* डिस्कस्‌, गोळा, डंबेल्स, प्लॅट, भाला, रिले बॅटन सेट, हातोडा आदी मैदानी खेळ साहित्य - थेट 28 टक्के 

व्यायाम महागला 
* ट्रेडमिल, सायकलसह व्यायामाचे अन्य साहित्य - 13.5 टक्‍यांवरून 28 टक्के 

हेल्मेटवरही टॅक्‍स 
हेल्मेट सक्ती केली तरी लोक वापरायला तयार नसताना सरकारने जीएसटी 18 टक्के लावला आहे. तो आधी 28 टक्के केला होता. त्यावर फेरविचारानंतर बदल झाला. 

ऑलिंपिकमध्ये देशाला पदके अधिकाधिक मिळायला हवीत, असे आपण म्हणत असताना क्रीडा साहित्यावर करवाढ करणे किती योग्य आहे, असा सवाल आता पालक उठवू लागले आहेत. क्रीडा साहित्य वितरक म्हणून मी वाढलेल्या करामुळे नाराजच आहे. सरकारने एक महिन्यात याबाबत पुनर्विचार होईल, अशी ग्वाही या क्षेत्रातील जाणकारांना दिली आहे. तसा निर्णय व्हावा. 
- नयन शहा, संचालक, रमणिकलाल शहा स्पोर्टस्‌ 

क्रीडा क्षेत्रावरचा कर वाढवणे चुकीचेच आहे. आपण खूप मागे आहोत. निधी द्या, अनुदान द्या. खेळाला प्रोत्साहन द्या. त्या उलट आर्थिक अडचणी वाढवणे कुठला न्याय आहे. खेळाडूंच्या गळ्याला विळा का लावता? खेळाडू अशाने क्रीडांगणावर येतील का? श्रीमंत खेळ स्नूकर, गोल्फला कर ठीक आहे. गरीब घरचे पालक त्यातून मागे फिरतील. 
- एस. एल. पाटील, क्रीडा प्रशिक्षक, सांगली

Web Title: sangli news GST sports