ढोल ताशाच्या निनादात मिरजेत उजाडला चैत्राचा पहिला किरण

संतोष भिसे
रविवार, 18 मार्च 2018

मिरज - मिरजेत आज मराठी नववर्षाची सकाळ उजाडली ती ढोल-ताशांच्या दणाणून सोडणाऱ्या आवाजासोबतच. गुढीपाडव्याच्या पहाटेला विविध संस्था व संघटनांनी "ब्रम्हकंपन" हा कल्पक व अनोखा उपक्रम राबवला.

मिरज - मिरजेत आज मराठी नववर्षाची सकाळ उजाडली ती ढोल-ताशांच्या दणाणून सोडणाऱ्या आवाजासोबतच. गुढीपाडव्याच्या निमित्ताने संस्था व संघटनांनी "ब्रम्हकंपन" हा कल्पक व अनोखा उपक्रम राबवला.

साडेतीनशेहून अधिक ढोल, ताशे व ध्वजांच्या साथीने उगवत्या सूर्याला आणि नव्या वर्षाला सलामी देण्यात आली. नववर्षाचे जोरदार जल्लोषात स्वागत करण्यात आले. हा उपक्रम पाहण्यासाठी शहरभरातून नागरीकांनी लक्ष्मी मार्केटसमोर गर्दी केली होती. ढोलवादनातले अनेक प्रकार तरुण-तरुणींनी सादर केले. शुभ्र गणवेष, कमरेला गच्च बांधलेला शेला आणि डोक्‍याला भगवे फेटे अशा रुपातील तरुणांचा उत्साह पाहण्याजोगा होता. एकाचवेळी साडेतीनशे ढोल वाजत असल्याने शहरभर त्याचे प्रतिध्वनी उमटत राहीले. वादन कर्णकर्कश्य न होता एका सुरात आणि माधुर्यपुर्ण निनादत होते. ठोक्‍यापाठोपाठ पडणारा ठोका अंगावर रोमांच निर्माण करत होता. वादकांच्या क्षमतेचा कस पाहत होता.

उपक्रमासाठी सांगली, मिरज शहर व परिसरातून ढोलपथके एकत्र आली होती. गेले काही दिवस त्यांचा एकत्रित सराव सुरु होता. त्याचे फलस्वरुप जोरदार वादन आज शहरवासीयांनी अनुभवले. चैत्राच्या पहिल्याच दिवशी मिरजकरांनी ढोल, ताशाची कंपने अनुभवली. ताशेवादक अग्रभागी होते. मध्यभागी आकर्षक रंगीबेरंगी रांगोळी रेखाटली होती; तिच्या दुतर्फा ढोलपथके होती. प्रत्येक ठेका, प्रत्येक लय, प्रत्येक सलामी आणि प्रत्येक समारोप अगदी शिस्तबद्ध होता. शेकडोंच्या संख्येने ढोलवादक एकत्र आलेले असतानाही गोंधळ किंवा गैरमेळ नव्हता. ध्वजधारी तरुण वादकांचा उत्साह चेतवत होते. गिरक्‍या घेत ध्वज उंजावत होते. हे अपुर्व चित्र डोळ्यांत सामावण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. दिड तासांच्या अखंड दणदणाटानंतर समाराेपाच्या सलामीने सांगता झाली. 

Web Title: Sangli News Gudipadva In Miraj