गुरुकुल महोत्सव १ पासून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

सांगली - येथील संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान व स्वरझंकार (पुणे) तर्फे यंदाचा तिसरा गुरुकुल संगीत महोत्सव येत्या एक व दोन ऑक्‍टोबरला होत आहे. सांगलीच्या सांस्कृतिक विश्‍वात या महोत्सवाने अल्पावधीत स्थान प्राप्त केले आहे. सांगलीच्या प्रसिद्ध गायिका सौ. मंजूषा पाटील यांनी गुरुकुलची स्थापना करतानाच देशभरातील प्रख्यात कलावंतांना सांगलीच्या भूमीत आग्रहपूर्वक आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

यंदा श्रीपाद लिंबेकर (पुणे) यांचे शास्त्रीय गायनाने महोत्सवाची सुरवात होईल. त्यानंतर पद्मश्री पंडित विजय घाटे (तबला) यांनी डिझाईन केलेला ‘ताल कचेरी’ हा वैविध्यपूर्ण कार्यक्रम असेल. त्यांच्यासोबत पंडित श्रीधर पार्थसारथी (मृदंग), शीतल कोलवलकर (कथ्थक) यांचे सादरीकरण असेल. तबला, मृदुंग, गायन आणि कथ्थकनृत्य अशा विविध कलावाद्यांचे हे फ्युजन अनुभवण्याची संधी सांगलीकर रसिकांना प्रथमच असेल. देश-परदेशात या कार्यक्रमास मोठी दाद 
मिळाली आहे. 

प्रथम सत्राची सांगता किराणा घराण्याचे प्रख्यात गवई पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार (धारवाड) यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. पंडित व्यकंटेश यांनी यापूर्वी एकदा मिरजेत आपली सेवा दिली आहे. देश-परदेशात अनेक यशस्वी मैफली करणारे  कुमार प्रथमच सांगलीत आपली कला सादर करतील.

दुसऱ्या दिवशी सत्राची सुरवात सोमवारी सकाळी ९ वाजता होईल. अमर ओक (पुणे) यांचे बासरीवादन, पं. अतुलकुमार उपाध्ये (पुणे) यांचे व्हायोलिन वादन  होईल. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या प्रख्यात शास्त्रीय गायिका सौ. मंजुषा पाटील यांच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाची सांगता होईल. या संपूर्ण कार्यक्रमाला श्रीराम हसबनीस, चिन्मय कोल्हटकर हार्मोनियम व प्रशांत  पांडव, अभिजित बारटक्के व सागर पाटोकर तबला साथ करतील.

वेळेत बदल
यंदा महोत्सवाची वेळ बदलण्यात आली आहे. रविवारी रात्री आठ वाजता भावे नाट्यमंदिरात पहिल्या सत्रास  प्रारंभ होईल. सुमारे चार तासांचे हे पहिले सत्र असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.२) सकाळी नऊ वाजता दुसऱ्या सत्राला प्रारंभ होईल. हे सत्र तीन तासांचे असेल. रसिकांनी या बदललेल्या वेळेची दखल घ्यावी, असे आवाहन अध्यक्ष गोविंद बेडेकर यांनी केले आहे.

Web Title: sangli news gurukul mahotsav