विषमुक्त शेती, कॅन्सरमुक्त भारत हेच लक्ष्य - हणमंतराव गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

‘विषमुक्त शेती’ आणि ‘कॅन्सरमुक्त भारत’ ही आपली घोषणा घेऊन ती यशस्वी करू शकतो, असा विश्‍वास भारतीय विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी येथे व्यक्त केला.

सांगली - पारंपरिकतेच्या गर्तेत सापडलेल्या भारतीय शेतीला आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व मूलभूत ज्ञान देण्याची गरज आहे. ते केले तर आपण एक-दोन वर्षांत भारताचे शेती उत्पन्न दुप्पट करू शकतो. ‘विषमुक्त शेती’ आणि ‘कॅन्सरमुक्त भारत’ ही आपली घोषणा घेऊन ती यशस्वी करू शकतो, असा विश्‍वास भारतीय विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी येथे व्यक्त केला. या साऱ्या प्रवासात ‘सकाळ’ने आम्हाला सोबत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

‘सकाळ’ सांगली विभागीय कार्यालयाच्या ३४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘बीव्हीजी’ ग्रुपच्या दोन दशकातील वाटचालीचा धावता आढावा घेतानाच श्री. गायकवाड यांनी आपला ‘झिरो ते हिरो’ असा सारा प्रवास अतिशय सहजपणे मांडताना सांगलीकरांना खिळवून ठेवले.

व्यासपीठावर महापौर हारुण शिकलगार, ‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर होते. सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी स्वागत केले.  

आरोग्य आणि आपत्कालीन सेवेसह विविध क्षेत्रातील ‘बीव्हीजी’चा प्रवास मांडताना श्री. गायकवाड यांनी शेती क्षेत्रातील नवनवे प्रयोग आणि भविष्यातील अनेक योजनांचा ऊहापोह केला. ते म्हणाले, ‘‘गेल्या १० जानेवारीला नीती आयोगापुढे बोलण्याची मला अडीच मिनिटांसाठी संधी मिळाली. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले की, तुम्ही पाच वर्षांत भारताचे शेती उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. जर नीट लक्ष देऊन केले तर हे उद्दिष्ट दोन वर्षांत पूर्ण होऊ शकते. त्यासाठी वेगळे काही तर शेतीचे मूलभूत ज्ञान आपल्याला दिले पाहिजे. कीटकनाशकांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी परकीय नव्हे, आपल्याकडील तंत्रज्ञानाचा उपयोग शक्‍य आहे. आमचे अनेक पिकांसाठी गुणकारी ठरलेले एकच कीटकनाशक आम्ही आधी पिऊन दाखवतो आणि नंतर त्याची फवारणी करतो. ॲग्रो मॅजिकसारखे न्यूट्रिशन अनेक पटीने शेती उत्पन्न वाढवू शकते. भाकड जनावरांपैकी ८२ टक्के जनावरे दुभती करता येतात, असे आमचे निष्कर्ष आहेत. असे खूप सारे संशोधन आम्ही समाजापुढे नेत आहोत. एकीकडे उत्पत्न वाढ आणि दुसरीकडे विषमुक्त शेती, अशी दुहेरी आव्हाने भारतीय शेतीला पेलावी लागतील. अशा शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे, त्यांचा शेतमाल स्वतःच खरेदी करणे, त्यावर सातारा येथील फूड पार्कमध्ये प्रक्रिया करणे, असा आमचा सारा पुढचा प्रवास असेल.’’

महासत्ता भारताचे स्वप्न आपल्याला स्वबळावर पूर्ण करावे लागेल, असे सांगताना त्यासाठी मानसिकतेत बदलांची गरज असेल, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘‘कौशल्य विकास हे आपले ध्येय हवे. आपल्याकडे पंधरा वर्षे शिक्षण घेऊनही तो पदवीधर कोणतेही कौशल्य न घेता बाहेर पडतो. याउलट ८ कोटी लोकसंख्येच्या जर्मनीत साध्या टाईल्स बनवण्यासाठी ३ वर्षांचा अभ्यासक्रम असतो. टाईल्स बसवल्याशिवाय त्याला सर्टिफिकेटच मिळत नाही. आमच्याकडे फक्त सर्टिफिकेटच मिळते. आपल्याकडे गुणवत्तेचा आग्रह नसतो. त्यामुळे मर्सिडिझ बेन्झ तीच; मात्र त्या गाडीतला दोष शोधणारा तिथला मेकॅनिक थेट तिथंपर्यंत पोहचतो. आपल्याकडे तोच दोष शोधण्यासाठी दोन दिवस लागतात.’’ 

ते म्हणाले, ‘‘जग रोजगाराच्या संधींनी भरले आहे. आपल्याला तिथंवर पोहचले पाहिजे. जगातील सर्व देशांत आपण गेले पाहिजे. सिंगापूरसारखा छोट्या देशात ७० लाख पर्यटक येतात. मुंबईत फक्त ३० लाख येतात.’’

‘बीव्हीजी’चे ध्येय
श्री. गायकवाड म्हणाले, ‘‘पुढील १२ वर्षांत भारतातील १० कोटी लोकांच्या जीवनात थेट परिवर्तनाचा ‘बीव्हीजी’ भागीदार असेल. १० लाख कर्मचारी या परिवारात असतील आणि जगातील १०० देशांत ‘बीव्हीजी’ पोचलेली असेल. रोज चांगले काम करा. स्वतःशीच स्पर्धा करा. फळाची तत्काळ अपेक्षा नको. सर्वोत्तम होण्यासाठी दररोज मरावे लागते.’’   

चला जग जिंकूया
गायकवाड म्हणाले, ‘‘इंग्लंडच्या राणीने सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. राणीने त्यांना पाठिंबा दिला आणि जगभरातील १०० देशांमध्ये पाठवले. राणीचा त्यांना फक्त पाठिंबा होता. मी परवा नीती आयोगापुढे पंतप्रधानांना सांगितले. तुम्ही भारतातील तरुणांना, उद्योजकांना परदेशात जाण्यासाठी संधी द्या. ते जग जिंकतील आणि भारताला समृद्ध करतील.’’

मी गोविंदा, श्रेय ‘त्यांचे’
‘बीव्हीजी’च्या यशाचे सारे श्रेय सर्व सहकाऱ्यांना देताना श्री. गायकवाड म्हणाले, ‘‘मी दहीहंडी फोडणारा शेवटच्या थराचा गोविंदा आहे. त्यामुळे मी दहीहंडी फोडली, असे म्हणण्याला काही अर्थ नाही. माझा प्रत्येक कर्मचारी हणमंतराव गायकवाडच आहे. त्याचा आणि माझा शर्ट एकच आहे. त्याच्या आणि माझ्या खिशावर ‘बीव्हीजी’ एवढेच लिहिले आहे. त्यामुळे तो पंतप्रधानासमोर उभा राहिला तरी त्याची ओळख ‘बीव्हीजी’ अशीच आहे; जी माझी आहे.’’

दिल्लीवर कब्जा ‘बीव्हीजी’चा
मराठी माणसांनी दिल्ली सर करण्याचे स्वप्न नेहमीच पाहिले. ‘बीव्हीजी’चे नऊ हजार कर्मचारी दिल्लीत कार्यरत आहेत. एका अर्थाने मराठी माणसाने दिल्लीच सर केली आहे. दिल्लीतील संसद, राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती भवन अशा सर्व प्रमुख कार्यालयांची स्वच्छतेची जबाबदारी कशी मिळाली, याचा प्रवास सांगताना श्री. गायकवाड म्हणाले, ‘‘२००४ मध्ये मुख्य पार्लमेंटच्या कामाचे बाहेरील स्वच्छतेचे काम मिळाले. आतील स्वच्छतेचे काम सुरक्षेच्या कारणास्तव मिळाले नाही. कारण त्या वेळी नुकताच संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. मात्र, काही दिवसांनंतर खासदारच विचारू लागले की, बाहेरील सारा परिसर इतका स्वच्छ आहे आणि सभागृहात मात्र इतकी अस्वच्छता का? मग त्यांना सांगण्यात आले की, ‘आतील काम परमनंट लोक करतात.’ त्यानंतर आम्हाला संपूर्ण संसदेचे काम मिळाले.’’

‘१०८’ची सेवा
आपत्तीच्या काळात धावणारी १०८ क्रमांकाची ॲम्बुलन्स सेवा सुरू करताना पुढील तीन वर्षांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचे उद्दिष्ट होते. तो किस्सा सांगताना गायकवाड यांनी ‘बीव्हीजी’ची कार्यप्रणालीच विषद केली. ते म्हणाले, ‘‘आम्ही हे काम दोन वर्षांत पूर्ण करू असे सांगितले; तेव्हा तुम्ही अतिआत्मविश्‍वास दाखवता असे समोरून सांगण्यात आले. त्यावर आम्ही वर्षात ही सेवा महाराष्ट्रभर पुरवू, असे आश्‍वासन दिले. मी माझ्या सहकाऱ्यांसमोर प्रस्ताव मांडला. त्यांनी हे काम अवघ्या पाच महिन्यांत पूर्ण केले. भामरागडपासून महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यांत आज ही सेवा पोहचली आहे.’’

 

Web Title: Sangli News Hanumantrao Gaykwad comment