दांडकी घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल! - हारुण शिकलगार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

सांगली - आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या अनुपस्थितीत महासभेत प्रशासनाच्या  दिरंगाईच्या कारभारावरून सदस्यांकडून वाभाडे काढले जात होते. महापौर हारुण शिकलगार यांनीही ‘आम्हालाही दांडकी घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल’, असा इशारा दिला.

सांगली - आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या अनुपस्थितीत महासभेत प्रशासनाच्या  दिरंगाईच्या कारभारावरून सदस्यांकडून वाभाडे काढले जात होते. महापौर हारुण शिकलगार यांनीही ‘आम्हालाही दांडकी घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल’, असा इशारा दिला. काही दिवस महापौर, सत्ताधारी वर्तुळातील नगरसेवक आयुक्तांच्या कारभारावर नाराज आहेत. महासभा कायदेशीर कचाट्यात अडकल्याने दफनभूमीच्या भूमी संपादनाचा धनादेश अडकला आहे. त्याचीही नगरसेवकांत नाराजी आहे. 

सत्ताधारी, विरोधी राष्ट्रवादीने अन्य कामांच्या मुद्द्यांना लक्ष्य करीत आयुक्तांना घेरण्याची रणनीती आखली  आहे. मात्र आज आयुक्तच गैरहजर राहिल्याने अपेक्षित मैदान रंगले नाही. एरवी महासभा म्हणजे चर्चा...चर्चा आणि केवळ चर्चा असेच चित्र आहे. आजही तेच झाले.

संजय मेंढे, शेखर माने, प्रियांका बंडगर, शुभांगी देवमाने यांनी आरोग्य, ड्रेनेज, नोकरभरतीवरून महापौरांनाच  लक्ष्य केले. महापौरांनी दिवाळीपूर्वी झालेल्या मदनभाऊ एकांकिका स्पर्धेच्या उद्‌घाटन समारंभात आयुक्तांना इशारा दिला होता. निवडणूकपूर्वी कामे दिसली पाहिजेत, अशी सदस्यांची भावना आहे. आजच्या सभेत सारेच सदस्य रेंगाळलेल्या फायली, निविदा, कामांवरून प्रशासनाविरोधात बोलत होते. 

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्थायी सभापती निवडीपासून एकत्र येत मोर्चेबांधणी केली आहे. शेखर माने यांनी सभा तांत्रिक बाबीत अडकवत असल्याचे  शल्य महापौरांनी सभेत नकळतपणे बोलून दाखवले. सभेच्या या तारखेच्या वादावर भाष्य करताना महापौरांनी ‘सभागृह चार दोन लोकांच्या मताने नव्हे तर बहुमताने चालते’ असे सांगत माने यांना डिवचले. त्यांच्या संख्याबळाकडे बोट रोखले. माने यांनी सभागृह कायद्याने चालते असे प्रत्युत्तर दिले.

एकमेव कृष्णा नदीतून पाण्याचा वाढीव कोट्यासाठी महासभेच्या ठरावाचा मुद्दा तसा तांत्रिकच होता. त्यावरही मानेंनी पाणी पुरवठा विभागाच्या बेहिशेबी कारभाराचे वाभाडे काढले. माने या विषयावर भरपूर बोलत होते त्यावेळी सारे शांतपणे बसून होते. या चर्चेत कोणाही सदस्याने साधा सहभागही घेतला नाही. अजेंड्यावरील या एकमेव विषयाची ही अवस्था. जुन्याच विषयांची सभेत उजळणी झाली. प्रत्यक्षात आयुक्त नसल्याने आरोपांचे फटाके फुसकेच ठरले. 

Web Title: Sangli News Harun Shikalgar comment in corporation meeting