उद्‌ध्वस्त आयुष्याला ‘नेदरलॅंड’चे हक्काचे छत

जयसिंग कुंभार
मंगळवार, 9 जानेवारी 2018

या वर्षी वीसपैकी पहिल्या दहा घरांची बांधकामे सुरू आहेत. झोपडीतून नवीन घरी जाण्याआधीचा उत्साह मुलांच्या चेहऱ्यांवर दिसतो आहे. नेदरलॅंडच्या नागरिकांनी दिलेला मदतीचा हात त्यांचे आयुष्य बदलणारा आहे.
- नारायण देशपांडे, सचिव, येरळा प्रोजेक्‍ट्‌स सोसायटी

सांगली - विधवा परित्यक्ता महिलांना कायद्याने बरेच काही दिले. मात्र, ते पदरात पडण्याआधीच अडथळे येतात. बऱ्याचदा ते हक्क, अधिकार मिळवताना माहेर-सासरच्या कुटुंबीयांसोबतचा संघर्ष करावा लागतो. यामध्ये हयात खर्ची पडते. शहरांमध्येही हेच वास्तव असताना, दुष्काळी जत तालुक्‍यातील उमदी पंचक्रोशीतील सुमारे २८ गावांमध्ये हे चित्र काहीसे वेगळे आहे. येथील महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देताना त्यांच्या डोईवर हक्काचे छतही उभे राहत आहे. या भागात येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीने गेले दीड वर्षे आधी हे काम सुरू केले आणि आता त्यासाठी नेदरलॅंडच्या संस्थेने पुढाकार घेतला आहे. कॉन्सेप्ट हाउसिंग नावाने हा प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे.

या वर्षी वीसपैकी पहिल्या दहा घरांची बांधकामे सुरू आहेत. झोपडीतून नवीन घरी जाण्याआधीचा उत्साह मुलांच्या चेहऱ्यांवर दिसतो आहे. नेदरलॅंडच्या नागरिकांनी दिलेला मदतीचा हात त्यांचे आयुष्य बदलणारा आहे.
- नारायण देशपांडे,
सचिव, येरळा प्रोजेक्‍ट्‌स सोसायटी

जतच्या तरुणांना रोजीरोटीसाठी लहान वयापासूनच बाहेर पडावे लागते. शिक्षणाअभावी भाकरीसाठीचा संघर्ष जोखमीचा, जीवावर बेतणारा असतो. विहिरी खणणे, रस्ते खोदाई, ऊसतोडी, मालवाहतुकीवर चालक, क्‍लीनर अशा कामासाठी इथले तरुण जातात. अनेकदा जीवाला देखील मुकावे लागते. त्यांच्या मागे तरुण विधवांचा वनवास सुरू होतो.

‘येरळा’च्या स्वयंसेवकांना इथल्या तीस-पस्तीस गावांमध्ये काम करताना अनेक कुटुंबे हलाखीत असल्याचे आणि विशेषतः तरुण विधवांचा प्रश्‍न प्रखरपणे जाणवला. बहुतांश विधवा अल्पशिक्षित आणि चूल व मूल यातच अडकलेल्या. त्यांना बऱ्याचदा सासरी दीर, सासू आणि सासरे किंवा माहेरी भाऊ, भावजयीच्या आश्रयाने जगावे लागते. परिणामी, हक्काच्या शेतीचा भाग मागणेही त्यांना अवघड होते. मागितलं तर मिळणारा निवाराही जायचा ही भीती. संबंध बिघडायची भीती. कोर्ट-कचेरीचा खटाटोप हा पुढचा अवघड भाग. हे दुखणे जाणून ‘येरळा’ने अशा कुटुंबांशी संवाद साधून ‘कन्सेप्ट हाउसिंग’ची कल्पना पुढे आणली.

या विधवा-परित्यक्‍त्यांना आधी शिलाईकाम प्रशिक्षण, शेळी-कुक्‍कुटपालन प्रकल्पात सहभागी केले. अर्थार्जनाच्या सोयीनंतर त्यांच्या हक्क अधिकारांसाठी कुटुंबासोबत संवाद घडवण्याकरिता संस्थेने प्रयत्न केले. त्यासाठी जे कुटुंबीय घरातील विधवा, परित्यक्ता महिलेला दोन एकर जमीन देतील, तिला संस्था ४८० चौरस फुटांचे घर बांधून देईल, असे सांगितले. या योजनेंतर्गत आतापर्यंत १० महिलांना घरे मिळाली. तेथे त्या राहायलाही लागल्या. गेल्या वर्षी नेदरलॅंडच्या ‘स्टिचटिंग जालीहाळ’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या घरांना भेटी दिल्या. त्यांना ही संकल्पना आवडली.

‘वाईल्ड गिज’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने ‘स्टिचटिंग जालीहाळ’सोबत अशा आणखी २० महिलांना घरे द्यायचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्‍यक साहित्य, मजुरी, पाण्याची टाकी, निर्धूर चूल आणि फळांची ३० रोपे दिली. एका घरामागे सुमारे ९० हजार रुपये खर्च होतात. हे घर स्वत: महिला गवंड्यासोबत काम करून उभे करतात. घरासोबतच या महिलांना नातेसंबंध न बिघडवता जमीन आणि हक्काचे घर मिळू लागले. यानिमित्ताने त्यांच्या आयुष्यात आशेचे नवे किरण दिसत आहेत.

Web Title: Sangli News helps from Citizens of the Netherland