हाय अल्टीट्युड बलून सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

इस्लामपूर - येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेन्टर फॉर इनोव्हेशन इंक्‍यूबेशन अँड एन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट मधील ‘स्पेस क्‍लब’ च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त तयार केलेल्या हाय अल्टीट्युड बलून सॅटेलाईटचे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी व कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर. डी. सांवत यांनी पत्रकार बैठकीत दिली.

इस्लामपूर - येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेन्टर फॉर इनोव्हेशन इंक्‍यूबेशन अँड एन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट मधील ‘स्पेस क्‍लब’ च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त तयार केलेल्या हाय अल्टीट्युड बलून सॅटेलाईटचे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी व कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर. डी. सांवत यांनी पत्रकार बैठकीत दिली. प्रा. शामराव पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी व श्री. सावंत म्हणाले, ‘‘हा सॅटेलाईट ३१ किलो मीटर इतक्‍या उंचीवर जाण्यासाठी व ३० किलोमीटर उंचीवरील धुलीकरणांचा नमुना गोळा करून खाली येण्याकरीता तयार करण्यात आला होता. देशातील अशा प्रकारच्या विद्यार्थीनिर्मीत सॅटेलाईटसाठी लोरा या कम्युनिकेशन प्रणालीचा इतक्‍या उंचीवर प्रथमच यशस्वीरित्या वापर करण्यात आला. हा सॅटेलाईट आरआयटीच्या विद्यार्थ्यांनी सेन्टर फॉर इनोव्हेशन इंक्‍युबेशन अँड इन्टरप्रिनरशिप डेव्हलमेंट मध्ये डिझाईन करुन विकसीत केला होता. त्याचे वजन १.८ किलो ग्रॅम होते.

२८ फेब्रुवारीला येथील राजारामबापू स्टेडियममधून सकाळी दहा वाजता हा बलून प्रक्षेपित केला होता. हा सॅटेलाईट सुमारे एक ते दोन मिटर प्रती सेकंद या गतीने उंच व वाऱ्याच्या दिशेने सोलापूर जिल्ह्याच्या दिशेने गेला. स्पेस क्‍लबची ट्रॅकिंग टीम सतत जीपीएस प्रणालीव्दारे सॅटेलाईटच्या संपर्कात होती. बलून सॅटेलाईटच्या प्रक्षेपणासाठी महाविद्यालयाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची परवानगी घेतली होती.

त्याचबरोबर स्थानिक अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती. स्पेस क्‍लबचे ग्राउंड स्टेशन सतत भारताच्या प्रधिकरणाच्या संपर्कात होते. अपेक्षेप्रमाणे ३२ किलो मीटर उंचीवर सोलापूर जिल्ह्यात हा बलून फुटला गेला. पॅराशुटव्दारे हा सॅटेलाईट (महूद ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील चौगुले यांच्या शेतामध्ये ऊसतोड चालू असताना सुस्थितीत उतरला. ट्रॅकिंग टीम त्याच्या मागावर महूद येथे पोचली.

सॅटेलाईटवरील मजकूर वाचून श्री. चौगुले यांनी ग्राउंड स्टेशन कंट्रोल रुमला फोन वरुन सॅटेलाईटबाबत माहिती दिली. त्या आधारे ट्रॅकिंग टीम घटना स्थळी पोहचली. व सॅटेलाईट घेऊन परतली. सॅटेलाईटने गोळा केलेला हवेचा नमुना हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲड रिसर्च भोपाळ येथील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी पाठवला जाणार आहे. तेथे त्यावर संशोधन चालू आहे. त्याशिवाय या सॅटेलाईटने ३० किलोमीटर पर्यंतचे छायाचित्रण केले आहे.

याशिवाय ‘ एक्‍सपेरिमेंटल रॉकेटरी क्‍लब ’ च्या विभागाने यशस्वीपणे चार साऊंडिंग रॉकेटचे यशस्वीपणे उड्डाण केले आहे. त्यांनी ६०० मीटर उंची गाठली आहे. या रॉकेटमध्ये सॉलिड प्रोपेलंट वापरले असून रॉकेटचे ज्वलन इलेक्‍ट्रानिक इग्निशन सिस्टिमने केले होते. हे रॉकेट कंट्रोल करण्यासाठी विद्यार्थिनिर्मित वायफाय मोड्यूल वापरले गेले होते. या सॅटेलाईटच्या निर्मितीसाठी २५ विद्यार्थ्यानी अहोरात्र प्रयत्न केले. सपना सूर्यवंशी, स्वरुप पाटील, शुभम पाटील, गौरव पाटील यांनी सबसिस्टिम इंजिनिअर म्हणून काम केले.

सिस्टिम इंजिनिअर म्हणून ओकांर कदम याने काम पाहिले. इंद्रजित निकम याने प्रोजेक्‍ट मॅनेजर म्हणून डिझाईन प्रक्षेपण व ट्रॅकिंग यांचे यशस्वी नियोजन केले. विभाग प्रमुख एम. व्ही. पिसाळ यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले होते. संस्थेचे अध्यक्ष भगतसिंह पाटील, आमदार जयंत पाटील, प्रा. शामराव पाटील यांचे या सर्व विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन मिळत आहे. या कामगिरीमुळे अभियांत्रिकी शैक्षणिक क्षेत्रात आरआयटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.’’

Web Title: Sangli News High altitude balloon satellite Successful launch