सांगलीतील खून पुतण्याकडून

सांगलीतील खून पुतण्याकडून

सांगली - आपटा पोलिस चौकीसमोरील अपार्टमेंटमधील हितेश ऊर्फ टिल्लूभाई जयंतीलाल पारेख (वय ४५) यांचा डोक्‍यात हातोडा घालून खून केल्याप्रकरणी त्यांच्या सख्ख्या पुतण्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली. सूरज अतुल पारेख (वय २३, रा. श्री अपार्टमेंट) आणि सौरभ रवींद्र कुकडे (१९, रा. वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रस्ता) अशी त्यांची नावे आहेत. पैशाच्या वादातून मित्राच्या मदतीने खून केल्याची कबुलीही त्याने दिली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

अपर अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईत विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या पथकाने खुनाचा उलगडा केला.

तीन तासांत खुनाचा उलगडा 
घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यातून पोलिसांनी तीन तासांत सूरज आणि सौरभला अटक केली. चौकशी केली असता दोघांनाही खून केल्याची कबुली दिली. सूरज गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर मिरज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सौरभच्या वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. तीन तासांत खुनाचा उलगडा झाल्याने अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तपासातील पोलिसांना रिवॉर्डही जाहीर केला.

दाखवली चोरी, निघाला खून

खून केल्यानंतर सूरज पारेख आणि सौरभ कुकडेने घरात चोरी झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. कपाटातील सोने व पैसे चोरून नेले. मृत हितेश यांच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही चोरीला गेल्याचे समजले, मात्र सूरज हा प्रकार झाल्यानंतर घटनास्थळी होता. हुशारीपणाने ‘मी काल इथे नव्हतो’ असे सांगत होता. त्यानुसार पोलिसांनी संशय व्यक्त करत तपास सुरू केला, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिली. 

श्री. शर्मा यांनी दिलेली माहिती अशी - श्री अपार्टमेंटमधील बी विंगमधील पाच क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये पारेख कुटुंबीय राहात होते. तेथे हितेश, त्यांची आई कमल आणि त्यांचा पुतण्या सूरज अतुल पारेख असे तिघे राहतात. इतर कुटुंबीय शहरात दुसऱ्या ठिकाणी रहाते. सूरज गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने कुटुंबीय त्याला वैतागले होते. त्यामुळे सूरजला घरातून हकलून दिले. सूरजने मित्र सौरभ कुकडेकडून पैसे उसने घेतले होते. ते पैसे भागवण्यासाठी सूरज काकांकडे आला. पैशांची मागणी केली. हितेश यांनी पैसे देण्यास नकार दिला. हाच राग मनात धरून काकाचा काटा काढण्याचा निर्णय सूरजने घेतला.    

मंगळवारी हितेश आणि त्यांची आई कमला पारेख (८१) घरी होते. रात्री आठच्या सुमारास सूरज आणि सौरभ घरी आले. हितेश यांच्याकडे पैशांची मागणी केली. नकार दिल्याने दोघांनीही हितेश यांच्या डोक्‍यात हातोडा घालून मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कमला यांच्यावरही हातोडीने हल्ला केला. त्यानंतर दोघांनीही तेथून पळ काढला. 

काल सकाळी कमल यांचा दुसरा मुलगा महेश आईला भेटण्यासाठी घरी आले. त्यावेळी फ्लॅटच्या दरवाजाला बाहेरून कडी होती. कुलूप अडकवले होते. महेश यांना संशय आला. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता हॉलमध्ये आई जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले. सोफ्यावर हितेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. जखमी कमल यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाची सूत्रे तत्काळ हलवली. पोलिसांनी सूरज आणि सौरभला अटक केली. पोलिस निरीक्षक प्रताप पोमण तपास करत आहेत.  कारवाईत विश्रामबाग ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश पाटील, रवींद्र आवळे, वसंत किर्वे, अमोल ढोले, अभिजीत गायकवाड, निलेश कोळेकर, सचिन कुंभार, सचिन फडतरे, असिफ सनदी, ऋतुराज होळकर, रोहित माने यांचा भाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com