मनोरुग्ण पत्नीच्या सेवेसाठी ‘त्यांनी’ सोडली भावकी-पांढरी

नागेश गायकवाड
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

आटपाडी -  प्रत्येक नवरोबाला आपली पत्नी सीता-सावित्रीसारखी आदर्श असावी अशीच अपेक्षा असते. मात्र, नवरोबा सत्यवान किंवा रामप्रमाणे आदर्श असावा, असा आग्रह मात्र धरला जात नाही. विवाह  म्हणजे जन्मोजन्मीच्या गाठी. त्या कठीण काळातही निभावल्या पाहिजेत, असा सार्वत्रिक आग्रह असणारा समाजही आता दुरापास्त झाला आहे.

आटपाडी -  प्रत्येक नवरोबाला आपली पत्नी सीता-सावित्रीसारखी आदर्श असावी अशीच अपेक्षा असते. मात्र, नवरोबा सत्यवान किंवा रामप्रमाणे आदर्श असावा, असा आग्रह मात्र धरला जात नाही. विवाह  म्हणजे जन्मोजन्मीच्या गाठी. त्या कठीण काळातही निभावल्या पाहिजेत, असा सार्वत्रिक आग्रह असणारा समाजही आता दुरापास्त झाला आहे. अशा काळात  तालुक्‍यातील शेटफळे गावचे शिवाजी रामू गायकवाड आदर्शच. कारण गेली पस्तीस वर्षे त्यांनी  मनोरुग्ण पत्नीची अखंड देखभाल करून संसार केला आहे. त्यासाठी त्यांनी गावची पांढरी सोडून दूर डोंगरात जाऊन आसरा घेतला आहे. मुले मोठी झाली. त्यांच्या संसाराला निघून गेली तर या पतीचा संघर्ष संपलेला नाही.

खासदार संजय पाटील आणि माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या हस्ते नुकताच गायकवाड यांचा येथे सत्कार झाला आणि एरवी गावकीपुरतीच ज्ञात असलेली त्यांच्या संघर्षमय कष्टप्रद संसाराची माहिती जगासमोर आली. शिवाजीराव आता पासष्टीचे आहेत. शेटफळेत गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील वस्तीवर त्यांचा मुक्काम असतो.

१९७७ मध्ये त्यांचा पत्नी निलाबाईशी विवाह झाला. त्यावेळी त्यांचे मानसिक आरोग्य चांगलेच होते. यथावकाश दोन मुले आणि एक मुलगी असा संसार फुलला. मात्र १९८३ मध्ये त्यांना मानसिक विकार जडला. बडबडणे, शेजाऱ्याशी भांडणे, दगड मारणे असे प्रकार झाल्याने शेजाऱ्यांनाही ते नकोसे झाले. शेवटी कुणालाच त्रास नको म्हणून त्यांनी आपला संसार हलवला. त्या वेळी अनेकांनी त्यांना दुसऱ्या विवाहाचाही सल्ला दिला. मात्र ते त्यांना रुचले नाही. आपल्या मूळ वस्तीला रामराम करून ते पत्नीसाठी दीड किलोमीटरवरील झोपडी बांधून मुलांसह राहू लागले. त्यानंतर त्यांनी पत्नीवर उपचाराचे प्रयत्न केले. नाना देव देवर्षी केले. मात्र फरक पडलाच नाही. उलट परिस्थिती अधिकच बिकट झाली. शिवाजीरावांनी त्या परिस्थितीतही धीर न सोडता संसार पेलला.

दररोज पहाटे उठून पत्नी आणि मुलांना आंघोळ आवरून, कुटुंबाचा स्वयंपाक, झाडलोट, धुणे-भांडी करून ते गंवडीकामाला दररोज सकाळी बाहेर पडत. अखंड पस्तीस वर्षे हीच त्यांची दिनचर्या आहे. पुन्हा संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा सारी जबाबदारी. या कष्टमय प्रवासात मुले मोठी झाली. शिक्षण घेऊन ती बाहेर गेली पण शिवाजीरावांचे हाल संपले नाहीत. एकही दिवस त्यांच्या या दिनचर्येत खंड पडला नाही. त्यामुळे त्यांना पै-पाहुण्यांकडे जायचेही मुश्‍कील झाले. आजही ते पत्नीची अंघोळ, कपडे, वेणीफणी, औषधोपचार असा सारा व्याप करीत असतात. त्यातच त्यांचा दिवस सरतो. किरकोळ कारणावरून घटस्फोटापर्यंत जाणाऱ्या जोडप्यांसाठी असे जोडपे परग्रहावरचेच वाटेल.

Web Title: Sangli News Human Interest story