संकरीत गाईंचा बाजार कोसळला

संतोष भिसे
बुधवार, 13 जून 2018

मिरज - दुधाला मागणी नसल्याने शेतकरी संकरीत गाईंना कत्तलखान्याची वाट दाखवू लागले आहेत. आज मिरजेतील बाजारात गाईंच्या किंमती पार घसरल्या होत्या. एरवी सत्तर ते ऐंशी हजारांच्या खाली न येणारी गाय आज चाळीस-पन्नास हजारांना विकली जात असल्याचे दिसून आले. 

मिरज - दुधाला मागणी नसल्याने शेतकरी संकरीत गाईंना कत्तलखान्याची वाट दाखवू लागले आहेत. आज मिरजेतील बाजारात गाईंच्या किंमती पार घसरल्या होत्या. एरवी सत्तर ते ऐंशी हजारांच्या खाली न येणारी गाय आज चाळीस-पन्नास हजारांना विकली जात असल्याचे दिसून आले. 

गेल्या दहा वर्षांत प्रथमच इतकी गंभीर स्थिती ओढवल्याची माहीती शेतकऱ्यांनी दिली. गाईचे दूध स्विकारण्यास दूध संघांनी नकार दिल्याने त्यांना बाजाराची वाट दाखवण्याशिवाय पर्याय राहीलेला नाही. मिरजेचा जनावर बाजार पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आज संकरीत गाईंची आवक मोठ्या प्रमाणात झाली; पण ग्राहक फिरकले नाहीत. त्यांच्या वाहतुकीचाही खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर पडला. किंमती वीस ते तीस टक्‍क्‍यांनी घसरल्याची माहीती शेतकऱ्यांनी दिली. ईदचा सण तोंडावर असल्याने बाजारात तेजी येईल असा अंदाज शेतकऱ्यांना होता; पण ग्राहकांच्या प्रतिक्षेतच संध्याकाळी बाजार संपला. तुलनेने म्हैस, शेळ्या-मेंढ्या आणि बैलांचा बाजार बरा होता. 

कडेगाव, शिरोळ, इस्लामपूर, कराड, जत, तासगाव, अथणी, कागवाड इत्यादी भागातून शेतकरी संकरीत गाई विक्रीसाठी घेऊन आले होते. दीड महिन्यांपासून गाईंची आवक वाढली असून मागणी नसल्याची माहीती संदीप जाधव या शेतकऱ्याने दिली.

उन्हाळ्याच्या दिवसांत गाईच्या दुधाला तसेच गाईंना मागणी असते; यंदा मात्र उलटा अनुभव आल्याचे ते म्हणाले. गाईंच्या कत्तलीला बंदी असल्याने खासगी वेशातील पोलिसांनी बाजारावर लक्ष ठेवले होते. कत्तलीसाठी गाईंची खरेदी-विक्री होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. खाद्याचे दर वाढल्याने भाकड गायींचे करायचे काय असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. तशीच अवस्था संकरीत गाईंच्या बाबतीतही झाली आहे. 

संकरीत गाईंची आजची उलाढाल 

  • लहानमोठी आवक 175,
  • विक्री 76. 
  • पाडींची सरासरी किंमत - 3 हजार 500 ते 5 हजार
  • गाईंची सरासरी किंमत - 17 हजार 500 ते 55 हजार

महिन्याभरापासून बाजार पडला

महिन्याभरापासून संकरीत गाईंचा बाजार पडला आहे. आवक होते; पण उठाव नाही. पावसाळा सुरु झाल्याने मागणी आणि दर वाढतील अशी अपेक्षा होती; पण ग्राहक फिरकेनासा झाला आहे. ही स्थिती कधीपर्यंत राहील हे निश्‍चित नाही. गाईंच्या किंमती पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत कोसळल्या आहेत
- डी. टी. पाटील,
वरिष्ठ लिपीक, मिरज दुय्यम आवार बाजार समिती

व्यवसाय आतबट्ट्याचा 
प्रत्येक बाजारात गाय विक्रीचा प्रयत्न करतोय; पण अपेक्षित दर मिळत नाही. पशुखाद्याचे दर वाढलेत आणि दुधाची विक्रीही होत नाहीये, त्यामुळे संकरीत गाय पाळणे आतबट्ट्याचा व्यवसाय ठरला आहे. 
- सागर जाधव
, शेतकरी

Web Title: Sangli News The hybrid cows market collapsed