बनावट गुटखा प्रकरणी मुसा जमादार रेल्वेतून निलंबित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

मिरज - बनावट गुटखाप्रकरणी अटकेत असलेल्या मुसा कासिम जमादारला रेल्वे प्रशासनाने निलंबित केले आहे. तसे आदेश नुकतेच मिरज रेल्वे स्थानकास मिळाले. रेल्वेतील पर्सोनेल विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या जमादारच्या जामिनावर निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने २ फेब्रुवारीस सुुनावणी ठेवली आहे. 

मिरज - बनावट गुटखाप्रकरणी अटकेत असलेल्या मुसा कासिम जमादारला रेल्वे प्रशासनाने निलंबित केले आहे. तसे आदेश नुकतेच मिरज रेल्वे स्थानकास मिळाले. रेल्वेतील पर्सोनेल विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या जमादारच्या जामिनावर निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने २ फेब्रुवारीस सुुनावणी ठेवली आहे. 

जमादार हा सध्या सांगली जिल्हा कारागृहाअंतर्गत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल आहे. मिरज रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या रजा, पगार, भत्ते यासाठीच्या असलेल्या पर्सोनेल विभागात जमादार हा ज्युनिअर क्‍लार्क म्हणून कार्यरत होता. तेथेही त्याने रेल्वे कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आपले वेगळे स्थान निर्माण केले.

वर्षभरापूर्वी आरग येथील बनावट गुटखा कारखाना प्रकरणात केंद्रीय उत्पादन शुल्कच्या विशेष पथकाने त्याला संशयित म्हणून अटकेची नोटीस दिली. अटक टाळण्याचे बरेच प्रयत्न करूनही जमादारला अटकपूर्व जामीन मिळाला नाही. या प्रकरणी केंद्रीय उत्पादन शुल्कने मुसा जमादारच्या दोन मुलांना यापूर्वीच अटक केली. या दोघांची जामिनावर मुक्तता झाली आहे. त्यानंतर मुख्य सूत्रधार म्हणून १८ डिसेंबरला जमादारला अटक झाली. याची माहिती केंद्रीय उत्पादन शुल्कने रेल्वे प्रशासनास कळवली. याच माहितीस अनुसरून रेल्वेच्या पुणे येथील ऑपरेशन विभागाने त्याच्या निलबंनाचे आदेश काढले.

दरम्यान याच गुटखा प्रकरणात केंद्रीय उत्पादन शुल्कने रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून रेल्वे स्थानकावर पार्सल विभागात बेनामी नावाने आलेल्या रिकाम्या गुटखा पुड्यांच्या पार्सलबाबतचीही माहिती घेतली आहे. हे पार्सल आल्यानंतर काही व्यक्तींनी रेल्वे स्थानकावर केलेला दंगा आणि त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या ताठर भूमिकेमुळे हे पार्सल सध्या जप्त मुद्देमाल म्हणून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे. नेमके हे पार्सल कोणी मागविले होते आणि त्यासाठी रेल्वे स्थानकावर कोणी धिंगाणा घातला याचीही सखोल चौकशी केंद्रीय उत्पादन शुल्कच्या विशेष पथकाने सध्या चालविली आहे. 

दरम्यान आज मुसा जमादारच्या जामीन अर्जावरील मिरज न्यायालयातील सुनावणी २ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. आज केंद्रीय उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी जमादार याच्याविरुद्ध आणखी काही पुरावे आणि माहिती मिळवण्यासाठी तपास मोहीम सुरूच ठेवली होती. या पथकाने मुसा जमादारसह त्याच्या दोन्ही मुलांना नुकतीच ३५७ कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस सोमवारी ( ता. २९ )  बजावली आहे. त्यानंतर आता या तिघांसह छाप्यावेळी अटक केलेल्यांविरुद्ध मिरजेच्या स्थानिक न्यायालयात स्वतंत्र दोषारोपपत्र पाठविले जाणार असल्याचेही केंद्रीय उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

विशेष पथकाकडून चौकशी
गुटख्यावर बंदी असूनही आरग मंगसुळी रस्त्यावर निर्जन ठिकाणी चालविल्या जाणाऱ्या गुटख्याच्या कारखान्यावर ७ फेब्रुवारी २०१७ रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून कोट्यवधींची यंत्रसामग्री आणि गुटखा तयार करण्याचे साहित्य जप्त केले. त्यानंतर कर्नाटक, गुजरातमध्येही छापे टाकून या गुटखा तस्करीत सहभागी असणाऱ्या अनेकांची सध्या याच केंद्रीय उत्पादन शुल्कच्या विशेष पथकाकडून चौकशी सुरू आहे.

Web Title: Sangli News illegal Gutaka Production