पाकिस्तानातून साखर आयात हा केंद्राचा सर्वात वाईट निर्णय - शेतकरी संघटना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

राज्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखाने संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानातून काही लाख टन साखर आयात केली. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत ही साखर दोन दिवसांपूर्वी दाखल झाली. साखरेचा दर बाजारभावापेक्षा एक रुपया कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. देशांतर्गत साखरेचा दर घटत असताना पाकिस्तानातून साखर आयात केली. निर्णयाबाबत साखर कारखानदार, शेतकरी संघटनेतील नेते व कार्यकर्त्यांनी ‘सकाळ’कडे मांडलेली मते. 

केंद्रातील भाजप पाकिस्तानला धडा शिकवणार होते. सीमेवर तणाव आहे. पाक सैनिक, पुरस्कृत अतिरेकी देशात हैदोस घातला आहे. तरीही साखर आयातीचा घेतलेला निर्णय दुर्दैवीच म्हणावा लागेल. साखर उद्योग, शेतकऱ्यांना मारण्याचेच धोरण स्पष्ट होते. यातून तातडीने मार्ग काढला नाही तर व्यवसायच धोक्‍यात येणार आहे. 
- अरुण लाड, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष

देशात साखर शिल्लक असताना पाकिस्तानची साखर आयातीमागे केंद्राचे शेतकरीविरोधी धोरण स्पष्ट होते. मोदींनी सत्तेवर येण्यापूर्वी उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची घोषणा फोल ठरली. साखरच नव्हे तर सर्व शेतमाल खुला करण्याची मागणी कायम आहे. भाजप, काँग्रेसचीही धोरणे शेतकरी विरोधीच आहेत.
- रघुनादादा पाटील,  शेतकरी संघटनेचे नेते 

गेल्या वर्षीपासून किरकोळ साखरेचा ४० ते ४२ रुपये किलो असलेला दर दोन महिन्यांपासून ३६-३८ रुपयांवर आला. सध्याचा किरकोळ विक्री दर २९ तर घाऊक दर २,४५० ते २,५५० पर्यंत आला आहे. पाकिस्तानची साखर बाजारात आल्याने आणखी दर घसरतील.’’  त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. 
- संजय कोले, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना

पाकिस्तानची साखर आयात करून सरकार देशातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. महाराष्ट्रात शेतकरी अडचणीत आहे. कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहे. अशातच सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली आहे. या धोरणाचा आम्ही निषेध करतो.
- उमेश देशमुख, अखिल भारतीय किसान 

देशातील शेतकऱ्यांना भाजप सरकारच्या नोटाबंदी निर्णयापासून शेतकऱ्यांना पणवती लागली आहे. शेतीमालाला दीडपट भाव नव्हे झालेली घरसण चिंताजनक आहे. याचे गंभीर परिणाम भोगाव लागणार आहेत. भविष्यात शेती आणि शेतकरी उध्वस्थ झाल्यास पुन्हा १९७२ च्या दुष्काळात मिलो धान्यांची आयातीची वेळ येणार वेळ लागणार नाही.
- राजाराम पाटील, कवलापूर 

Web Title: Sangli News import of Sugar from Pakistan issue