कीटकनाशक फवारणीचे पक्षांवर विपरित परिणाम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

सांगली - द्राक्ष आणि डाळिंबावरील कीटकनाशक फवारणीचे पक्षांवर विपरित परिणाम होत आहेत. आटपाडीतील ढबई कुरण पक्ष्यांचे  आश्रयस्थानच. इथे पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या अभ्यासकांच्या निदर्शनास ही बाब आली.त्यांना वेगवेगळ्या जातीचे पक्षी मृतावस्थेत आढळले.  

सांगली - द्राक्ष आणि डाळिंबावरील कीटकनाशक फवारणीचे पक्षांवर विपरित परिणाम होत आहेत. आटपाडीतील ढबई कुरण पक्ष्यांचे  आश्रयस्थानच. इथे पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या अभ्यासकांच्या निदर्शनास ही बाब आली.त्यांना वेगवेगळ्या जातीचे पक्षी मृतावस्थेत आढळले.  यामागच्या कारणांचा अभ्यास होणे तसेच त्यादृष्टीने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याकडे लक्ष वेधणार असल्याचे पक्षी निरीक्षक शरद आपटे यांनी सांगितले. 

श्री आपटे म्हणाले,‘‘आटपाडी येथील ढबई कुरण  क्षेत्राच्या पश्‍चिम सीमेवरील परिसरात जंगल लावा (jungle  bush quail) नर आणि मादी जातीचे दोन पक्षी तसेच सातभाई (large Grey Babbler) असे एकूण तीन पक्षी एकमेका जवळच मृत अवस्थेत पडले होते. आम्ही या परिसरात पाहणी केली असता त्या परिसरात नुकतेच कीटक नाशक फवारण्यात आल्याचे दिसले. संपूर्ण परिसरात औषधाचा उग्र वास पसरला होता. पक्षी तपासल्यावर त्यांच्या शरीरावर कोणतीही जखम अथवा मार लागल्याची चिन्हे नव्हती. नैसर्गिक मृत्यू संभवतो मात्र तीन वेगवेगळ्या जातीचे तीन पक्षी एकाच ठिकाणी कसे मेले हा प्रश्‍न  उरतो. 

या पक्ष्यांना शिकारी पक्षी अगर प्राण्यांनी मारले म्हणावे तर त्यांनी ते भक्ष का खाल्ले नाही आणि  तीन पक्षी एकाठिकाणी का टाकले. माणसांनी शिकार केली म्हणावी तरी पुन्हा तोच प्रश्न येतो मग त्यांना उचलून 
नेले का नाही. लावा पक्षी मारणे फार कठीण असते. यातून स्पष्ट निष्कर्ष निघतो की हे मृत्यू औषध फवारणीमुळेच झाले. शेतकऱ्यांनीही हे पक्षी आपल्या शेतातून बाजूला नेऊन टाकलेले असू शकतात.’’

फवारणींमुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटना ताज्या आहेत. पुरेशी दक्षता नसणे हे कारण आहेच. मात्र पक्ष्यांचे मृत्यू टाळण्यासाठी औषध कंपन्यांनीच पुरेशी दक्षता घेतली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी औषधांच्या विक्रेते व कृषी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घ्यावी. तेथे पक्षी निरीक्षकांनाही निमंत्रित करावे. त्यांचे अनेक अनुभव पुढच्या घटना टाळण्यासाठी उपयोगी ठरतील. पक्ष्यांचे अन्न साखळीत खूप महत्त्वाचे स्थान आहे. अनेक कीडअळींचा पक्षीच परस्पर बंदोबस्त करीत असतात. हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.’’
- शरद आपटे, पक्षी अभ्यासक
 

Web Title: sangli news insecticide effect on birds