मिरज-सांगली बससेवेचे करायचे काय?

संतोष भिसे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

मिरज-सांगली व कुपवाडदरम्यान दररोज साडेचारशे ते पाचशे रिक्षा धावतात. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या समांतर वाहतूक यंत्रणेने शहर बससेवेपुढे आव्हान निर्माण केले आहे. मिरज आगाराला दररोज किमान पन्नास हजारांचा फटका मिरज-सांगली मार्गावर बसतो. भारमान खाली घसरले आहे. ते सावरण्यासाठी सामुदायिक प्रयत्न  एसटीने केले नाहीत.

मिरज - मिरज-सांगली दरम्यानची शहर बससेवा सातत्याने तोट्यात जात आहे. प्रवाशांसाठी तिचे अस्तित्व संपू लागले आहे. दिवाळीत संपामुळे राज्यभर प्रवासी हैराण झाले होते; मिरज-सांगली मार्गावर मात्र रिक्षा संघटनांनी अखंड सेवा सुरू ठेवली. प्रवाशांची गैरसोय झाली नाही. यामुळे शहरी वाहतूक सेवा असली काय आणि नसली काय? असे प्रवाशांना वाटू लागले आहे. एसटी प्रशासन व कर्मचारी संघटनांवर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. 

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे एसटीचे ब्रीद सांगली-मिरजेबाबतीत कधीच हद्दपार झाले आहे. शहर बससेवेचे घोंगडे झटकून टाकण्याचा विषय एसटी प्रशासनात नेहमी चर्चेला येतो. महापालिकेकडे सोपवण्याचा सूरही उमटतो. दिवाळीतील संपादरम्यान हा विषय पुन्हा चर्चेला आला. दिवाळीत सहाआसनी रिक्षा व्यावसायिकांनी समांतर यंत्रणा राबवली. बसचे थांबे ताब्यात घेतले. पण संपाचा गैरफायदा घेण्यासाठी लुबाडणूकही केली नाही. कुपवाड, म्हैसाळ, मालगाव, कुरुंदवाड, नृसिंहवाडी या मार्गांवरही रिक्षा धावल्या. संपाचे अस्तित्वही जाणवू दिले नाही. 

मिरज-सांगली व कुपवाडदरम्यान दररोज साडेचारशे ते पाचशे रिक्षा धावतात. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या समांतर वाहतूक यंत्रणेने शहर बससेवेपुढे आव्हान निर्माण केले आहे. मिरज आगाराला दररोज किमान पन्नास हजारांचा फटका मिरज-सांगली मार्गावर बसतो. भारमान खाली घसरले आहे. ते सावरण्यासाठी सामुदायिक प्रयत्न  एसटीने केले नाहीत. ही बससेवा बंद करण्याची भाषा काही जण करत असतात. वडाप हा काही ग्राहकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आदर्श उपाय नाही. अर्थात तोटा कमी करून अधिक चांगली सेवा देण्याचा विचार एसटीने करण्याची गरज आहे. अन्य मार्गांवर मिनी बस सोडल्या आहेत तशा सांगली-मिरज मार्गावर सोडण्यास काय  हरकत आहे?

मिरज-सांगली बस वाहतूक महापालिकेने चालवावी यासाठी आम्ही पत्र दिले होते. मात्र त्यांनी असमर्थता दाखविली. खासगी किंवा वडापसारखी वाहतूक प्रवाशांची लूट करू शकते. आज एसटीच्या किफायतशीर दरामुळेच लोकांना दिलासा आहे. योग्य दरात सेवा मिळावी यासाठीच एसटीचे धोरण आहे. ते अधिक प्रभावी करण्यासाठी उपाय करू.
शैलेश चव्हाण, विभाग नियंत्रक, रापम.

अधिकारी, कर्मचारी आत्मपरीक्षण करतील?
सांगली-मिरजेदरम्यान अशी स्थिती असेल तर शहर बससेवेची गरज आहे काय, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी संघटनांवर आली आहे. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात महामंडळ ही सेवा बंद करू शकते. प्रशासन आणि संघटनांनी एकत्र येऊन शहर बससेवेला पुन्हा सोन्याचे दिवस  आणण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. 

शहर बससेवा कोलमडण्याची कारणे
योग्य नियोजनाअभावी मिरज-सांगलीदरम्यानची बससेवा कोलमडली आहे. सकाळी नऊ ते बारा आणि  संध्याकाळी चार ते सात या सर्वाधिक गर्दीच्या वेळी तासाला एखादी गाडी धावते. याचा फायदा रिक्षाचालक घेतात. सकाळी सात ते नऊ या वेळेत अनेकदा मिरज-सांगली फेरीला फक्त तीस ते पस्तीस रुपये मिळतात. संघटना आणि प्रशासनातील समन्वयामुळे वेळापत्रक कोलमडते. काही कर्मचारी वशिल्याने  सोयीच्या ड्युट्या मिळवतात; त्यामुळे चांगल्या उत्पन्नाच्या फेऱ्यांसाठी कर्मचारी मिळत नाहीत.  कुरुंदवाड, मालगाव, नरवाड, ढवळी, एमआयडीसी या फायद्याच्या फेऱ्या अनेकवेळा रद्द होतात. स्थानकातील गर्दी पाहून ऐनवेळा विशेष गाड्या सोडण्याचे प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागातील शहर बससेवेचे चढे दरही तोट्याला कारणीभूत ठरले आहेत. 

रिक्षासेवा सक्षम आहे - रिक्षा संघटना
पॅगो रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश चौगुले म्हणाले, ‘‘सांगली-मिरजेत प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षासेवा सक्षम आहे हे एसटीच्या संपादरम्यान आम्ही दाखवून दिले.  जादा पैसे न घेता सर्व मार्गांवर आम्ही वाहतूक केली. माधवनगर, अहिल्यानगर, कुपवाडची उपनगरे यासह ग्रामीण भागातही पोहोचलो. खासगी कामांसाठीच्या  रिक्षाही प्रवासी सेवेसाठी उतरवल्या. पासधारक विद्यार्थी सोडले तर अन्य प्रवाशांसाठी रिक्षा सेवा सक्षम  असल्याचे सिद्ध केले आहे.’’ 

Web Title: sangli News inter city bus transport in loss