इस्लामपूर पालिकेत 127 कोटींचा अर्थसंकल्प सादर

इस्लामपूर पालिकेत 127 कोटींचा अर्थसंकल्प सादर

इस्लामपूर - इस्लामपूर नगरपालिकेच्या आजच्या विशेष सभेत १२६ कोटी ५३ लाख ६४ हजार ८६४ रुपयांचा अर्थसंकल्प सत्ताधारी विकास आघाडीने सादर केला. विरोधकांचे आक्षेप विचारात घेऊन दुरुस्तीचे आश्वासन देत अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीत विशेष सभा झाली. प्रारंभी हा अर्थसंकल्प महसुली तुटीचा असल्याची टीका संजय कोरे यांनी केली.

उपभोक्ता कर आणि मालमत्ता कराचे पुनर्मुल्यांकन यावर आक्षेप घेतला. प्राप्त अनुदानापेक्षाही आस्थापनेवर होणारा जादा खर्च, निव्वळ शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागणे तसेच फक्त योजनांचा उल्लेख आहे; पण तो निधी कुठून येणार? याची माहिती नसल्याच्या त्रुटीवर कोरे यांनी बोट ठेवले. मागील आणि या अर्थसंकल्पात १०१ कोटींचा फरक का? असा सवाल विश्वनाथ डांगे यांनी उपस्थित केला.

जनतेवर कोणतीही करवाढ न लादण्याच्या कोरेंच्या सुचनेवर विक्रम पाटील यांनी आक्षेप घेतला. एकीकडे उत्पन्न वाढवा आणि दुसरीकडे करही वाढवू नका, हे कसे काय? असे ते म्हणाले. जयश्री माळी यांनी प्राणिसंग्रहालय आणि नक्षत्र उद्यानाचा विषय मांडला. दलित वस्तीत ते करणार असल्याचे सांगण्यात आले.

शहाजी पाटील यांनी टॉवरकडून मिळणारे उत्पन्न, नागरी आरोग्य केंद्र, प्रेरणा अभियान आदी मुद्दे उपस्थित केले. विक्रम पाटील यांनी हा अर्थसंकल्प पारंपरिक नसल्याचे सांगत विकासाला चालना देणारा असल्याचे सांगितले. मुरलीकांत पेठकर, नितीन मदने यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला. शिवरायांच्या अवमानप्रकरणी छिंदमचा निषेध नोंदवला. प्राथमिक शाळेतील मुलींना प्रोत्साहन भत्ता वाढविण्याची सूचना सुप्रिया पाटील यांनी केली.

पाटील-पवार यांच्यात शाब्दिक चकमक

शहाजी पाटील आणि वैभव पवार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. शहाजी पाटील यांच्याकडून गटनेत्यांच्या नावाचा उल्लेख न झाल्याने पवार यांनी खिल्ली उडवली. त्यावर 'मी आणि अध्यक्ष बघून घेतोय, तुम्हाला काय करायचाय चोंबडेपणा?' असे म्हणत पाटील भडकले. नगराध्यक्षांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. 

आदर्श पुरस्कार लवकरच

अर्थसंकल्पातील पुरस्कार योजना तरतुदीवर खंडेराव जाधव, संजय कोरे यांनी प्रश्न उपस्थित केले. खेळाडू आणि आदर्श पत्रकार पुरस्कार लवकरच दिले जातील, असे आश्वासन नगराध्यक्ष पाटील यांनी दिले.

दृष्टीक्षेपात अर्थसंकल्प
महत्त्वाच्या तरतुदी : भाजी मार्केट १७ कोटी, नगरपरिषद प्रशासकीय इमारत २२ कोटी, पुरस्कार ३.५ लाख, मोकाट जनावरे बंदोबस्त ८ लाख, महिला स्वच्छतागृह २० लाख, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी वसतिगृह ३० लाख, इस्लामपूर महोत्सव २० लाख, सिग्नल व्यवस्था ३० लाख, स्वागत कमान ३० लाख, बगीचा विकास ७० लाख, मैदाने ५० लाख, जलतरण तलाव ८५ लाख, मटण मार्केट २० लाख, पुतळा व परिसर विकास ५० लाख, प्राणिसंग्रहालय ३५ लाख, नक्षत्र उद्यान ३० लाख,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com