इस्लामपूरातील वाचन चळवळ पोहोचली देशाच्या सीमेवर !

धर्मवीर पाटील
सोमवार, 15 जानेवारी 2018

इस्लामपूर - पुस्तके वाचली जात नाहीत, वाचन संस्कृती नष्ट होत चाललीय, अशी ओरड करण्यापेक्षा वाचक वाढावेत; किंबहुना वाचकांपर्यंत पोचण्यासाठी म्हणून काही वेगळे प्रयत्न करावेत, या हेतूने सुरू झालेली वाचन चळवळ आता देशाच्या सीमेवर पोचली आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, इस्लामपूर भागातील कार्यकर्त्यांनी जवानांच्या माध्यमातून जिथे मराठी पुस्तकेच नाहीत, अशा ठिकाणी पुस्तके पोचवली आहेत.

इस्लामपूर - पुस्तके वाचली जात नाहीत, वाचन संस्कृती नष्ट होत चाललीय, अशी ओरड करण्यापेक्षा वाचक वाढावेत; किंबहुना वाचकांपर्यंत पोचण्यासाठी म्हणून काही वेगळे प्रयत्न करावेत, या हेतूने सुरू झालेली वाचन चळवळ आता देशाच्या सीमेवर पोचली आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, इस्लामपूर भागातील कार्यकर्त्यांनी जवानांच्या माध्यमातून जिथे मराठी पुस्तकेच नाहीत, अशा ठिकाणी पुस्तके पोचवली आहेत.

इस्लामपुरातुन गेल्या दोन महिन्यांत ३५ जवानांमार्फत सुमारे हजारहून अधिक पुस्तके सीमेवर पोचली आहेत. सीमेवर प्रादेशिक भाषेतील पुस्तके लष्कराच्या ग्रंथालयात देण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम असून यात सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात येत आहे.

कडेगाव भागातील वाचनवेडा असणारा सुनील चव्हाण हा तरुण या वाचन चळवळीचा शिलेदार आहे. त्याची संकल्पना इस्लामपुरात प्रा. डॉ. संजय थोरात यांनी उचलली आणि एकमेकांच्या साथीने या चळवळीने आज आणखी वेग घेतला आहे. वैयक्तिक पातळीवर गरजू तसेच आवश्यक ठिकाणी पुस्तके देण्याच्या प्रक्रियेतून ही वाचक चळवळ आज इतकी विस्तारली आहे.

सीमाभागात कार्यरत असलेल्या जवानांमध्ये मराठी युवकांची संख्या लक्षणीय आहे. या ठिकाणी असणाऱ्या ग्रंथालयात मात्र केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेतील पुस्तके आहेत. इथे मराठी जवानांना वाचण्याची इच्छा असली तरी पुस्तके नसल्याने पर्यायी मार्ग शोधावे लागतात. नेमकी ही गरज ओळखून सुनील चव्हाण आणि संजय थोरात यांच्या पुढाकाराने इस्लामपूर परिसरात वेग घेतलेल्या वाचन चळवळीने आतापर्यंत सुमारे हजारहुन अधिक पुस्तके सीमेवर पोचवली आहेत. जम्मू कश्मिर, दिल्ली, आसाम, त्रिपुरा, छत्तीसगढ, राजस्थान या भागात कार्यरत असलेल्या रेठरेधरण, गोटखिंडी, येडेनिपाणी, इटकरे, वाळवा, कुरुंदवाड, जयसिंगपूर, नेवरी, अंजनी या गावातील जवानांच्या माध्यमातून पुस्तके दिलीत. 

सांगली जिल्ह्यातील विविध भागात सुट्टीवर येणारे जवान शोधले जातात. त्यांना परत कामावर रुजू होण्यापूर्वी त्यांच्याकडे साधारण २५ ते ३० पुस्तके समारंभपूर्वक दिली जातात. कुटुंबियांना सन्मानित केले जाते. त्यांना उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले जाते.  सध्या वाढदिवस, एकसष्ठी, सत्कार अशा विविध औचित्यपूर्ण प्रसंगी पुस्तके जमा केली जात आहेत. या उपक्रमात दीपक स्वामी, मिलिंद थोरात, राम घुले, उमेश कुरळपकर, सतीश चौगुले, विजय गायकवाड, विनोद मोहिते, एकनाथ पाटील आदी लोक सक्रिय आहेत.

Web Title: Sangli News Islampur Reading Books movement