जलयुक्त शिवारचे अजूनही 100 कोटी शिल्लक 

जलयुक्त शिवारचे अजूनही 100 कोटी शिल्लक 

सांगली, - जलंधारण मंत्री प्रा. राम शिंदे आधी, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपुर्वी धारेवर धरल्यानंतर जलयुक्त शिवारची सन 2016-17 च्या हंगामातील कामे जूनअखेर पुर्ण करण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. सध्या तीन हजार कामे पुर्ण झाली आहेत. सुमारे 1160 कामे प्रगतीपथावर आहेत. त्यासाठी 50 कोटींचा निधी खर्च झाला, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र साबळे यांनी दिली. मात्र अजून 140 पैकी 89 गावांत निम्म्यापेक्षा कमी कामे झालीत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. ही कामे प्राधान्याने पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र ढिसाळ नियोजनामुळे मार्च संपला तरी हंगामातील 157.13 कोटींच्या आराखड्यातील अवघे 36 कोटी रूपये खर्च करुन 30 टक्केच कामे पुर्ण झाली होती. यावरुन जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे आणि आठवड्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. निधी असतानाही कामांना मंजुरी नाही, कामे पुर्ण होत नाहीत, कृषी, छो.पा.वि., वन आदी महत्वाच्या विभागांची मोठी जबाबदारी जलयुक्त शिवारमध्ये आहे. मात्र या विभागांनी मार्च अखेर केवळ 20 टक्के कामे केली. शासनाच्या महात्वाकांक्षी कार्यक्रमापासून अधिकाऱ्यांना जबाबदारी झटकू नये, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. 

त्यानंतर अधिकारी खडबडून जागे झाले. कामालाही लागले. यंदाच्या हंगामातील कामे पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जून अखेरची मुदत दिली होती. त्यामुळे कृषी विभागासह सर्वच विभागांनी आपल्या क्षेत्रातील कामे वेगाने पुर्ण करण्याची मोहिमच उघडली. आता हा आकडा 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाला. पण खर्च मात्र केवळ 49.20 कोटी इतकाच झाला. अजून 100 कोटींचा निधी शिल्लक आहे. 

श्री. साबळे म्हणाले,""गतवर्षीसाठी जलयुक्त शिवारमध्ये 140 गावे होती. सर्व गावात कामे सुरू झालीत. 4059 कामांचा आराखडा केला होता. त्यापैकी 2917 कामे 23 जूनअखेर पूर्ण झालीत. तर 1168 कामे प्रगतीपथावर आहेत. त्यावर 49.20 कोटी रूपये खर्च झाले आहेत. यात सर्वाधिक 30 गावे जत तालुक्‍यातील आहेत. वाळवा, शिराळा तालुक्‍यातील गावांचाही समावेश करण्यात आला होता.'' 

वेग वाढला कसा? 
जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांच्या आढाव्यावेळी जलयुक्त शिवारची 36 टक्केच कामे झाल्याचे निदर्शनास आले. प्रशासकीय मान्यतेसाठी बरीच कामे प्रलंबित होती. आठच दिवसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीही आढावा बैठक घेऊन जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामांबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावेळी हाच आकडा 80 टक्‍क्‍यांवर गेला. हे कसे? अपूर्ण, प्रलंबित कामे पुर्ण करण्यास मुख्यमंत्र्यांनी जून अखेरची मुदत दिली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने जलयुक्त शिवारच्या कामांना मान्यता देऊन गती दिली. 

श्री. साबळे म्हणाले,""प्रगतीपथावरील कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे. काही कामांना शेतकऱ्यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर नकार दिला, अशी पाच-सात टक्के कामे प्रलंबित आहेत. मात्र बहुतांशी कामे पुर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.'' 

ते म्हणाले,""सन 2017-18चा जलयुक्त शिवारचा आराखडाही तयार आहे. 140 गावांची निवड केली असून 3002 कामांचा आराखडा करण्यात आला आहे. त्याला गुरुवारी विभागीय आयुक्तांच्या बैठकीत मान्यता मिळणार आहे. त्यानंतर ही कामेही सुरू केली जातील.'' 

अजून बरीच कामे अपूर्ण 
गेल्या हंगामातील 140 पैकी केवळ 21 गावात कामे पुर्ण झालीत. 30 गावात 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कामे पुर्ण आहेत. निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 89 गावात 50 टक्केही कामे झालेली नाहीत. त्यामुळे जून अखेर कामे पुर्ण होणे अशक्‍य आहेत. 157 कोटींच्या निधीतील केवळ 49.20 कोटी रूपयेच खर्च झालेत. अजून शंभर कोटीचा निधी बाकी आहे. त्यामुळे अजूनही कामांना गती देण्याची गरज आहे. 

सन 2016-17 ची स्थिती 
तालुका गावे पुर्ण कामे प्रगतीपथावरील कामे एकूण कामे झालेला खर्च (कोटीत) 
खानापूर 11 186 133 319 5.65 
कवठेमहांकाळ 16 254 269 523 3.80 
तासगाव 12 330 39 369 6.06 
मिरज 17 412 66 478 4.38 
कडेगाव 6 116 25 141 3.77 
आटपाडी 13 149 73 196 1.71 
जत 30 1036 466 1502 14.18 
वाळवा 18 264 50 314 3.99 
शिराळा 14 140 43 183 2.57 
पलूस 3 30 4 34 3.09 
एकूण 140 2917 1168 4059 49.20 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com