सरकार उलथवण्यासाठी यापुढेही साथ द्या - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

इस्लामपूर - राज्यातील जातीयवादी सरकार उलथवून लावण्यासाठी जनतेने मला यापुढेही साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. राज्यात फार कमी मतदारसंघ असे आहेत; जिथे सातत्य आहे आणि त्यापैकी एक मी असल्याचा अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

इस्लामपूर - राज्यातील जातीयवादी सरकार उलथवून लावण्यासाठी जनतेने मला यापुढेही साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. राज्यात फार कमी मतदारसंघ असे आहेत; जिथे सातत्य आहे आणि त्यापैकी एक मी असल्याचा अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीनंतर जयंत पाटील यांचे प्रथमच तालुक्‍यात आगमन झाले. त्यानिमित्ताने त्यांची भव्य मिरवणूक काढून शहरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘साहेब, तुम्ही इस्लामपूरच्या बाबतीत निश्‍चिंत राहा, राज्यात लक्ष घाला आणि हे सरकार उलथवून टाका’, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

 सायंकाळी ५ वाजल्यापासून पंचायत समितीच्या आवारात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. शहरात ठिकठिकाणी अभिनंदन, स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्यांचे कासेगावत  सायंकाळी ८ च्या सुमारास आगमन झाले. येथे त्यांनी राजारामबापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले. नंतर नेर्ले, पेठनाका येथेही त्यांचे जोरदार स्वागत झाले. रात्री ९ वाजता जयंत पाटील इस्लामपुरात आगमन झाले. शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघाली. यात तालुक्‍यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

तरुण मोटारसायकलवरून सहभागी झाले होते. तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, मानसिंग नाईक, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, विजयभाऊ पाटील, दादासाहेब पाटील, खंडेराव जाधव, संग्राम पाटील, शहाजी पाटील, दिलीप पाटील, पी. आर. पाटील, शामराव पाटील, विनायक पाटील, छाया पाटील, प्रतीक आणि राजवर्धन पाटील उपस्थित होते.

भाजपच्या विक्रम पाटलांच्या गळ्यात पुष्पहार!
आमदार पाटील यांची जल्लोषी मिरवणूक सुरू असताना योगायोगाने रस्त्यात भेटलेल्या भाजपच्या विक्रम पाटील यांना जयंतरावांनी थेट जवळ बोलावत त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातला. या प्रसंगाने अनेकांच्या भुवया उंचावल्या; मात्र खुद्द जयंतरावांनी हा पुष्पहार त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घातला असल्याचे स्पष्टीकरण जागेवरच दिले.

Web Title: Sangli News Jayant Patil comment