जयंतराव आले, आणखी कोण पाहिजे? 

जयंतराव आले, आणखी कोण पाहिजे? 

सांगली - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार जयंत पाटील समर्थक आणि दिवंगत आर. आर. पाटील समर्थक गटात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोमवारी (ता.3 जुलै) सांगली दौऱ्यावर आहेत. त्याच्या नियोजनासाठी पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत आबा गटाच्या तक्रारीवरून हा प्रकार घडला. 

आबा गटाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ताजुद्दीन तांबोळी यांनी आबांच्या पश्‍चात गटाची परवड सुरू आहे, आम्हाला मारहाण झाली, हल्ले झाले तरी वरिष्ठ नेते तिकडे फिरकले नाहीत, असा सूर आळवला. जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी त्याच क्षणी त्यांना रोखले आणि दमात घेतले. "तुमची ही भाषा थांबवा, अशाने चुकीचा संदेश जातो. पक्षाची बदनामी होते. तुम्ही संकटात असताना जयंत पाटील स्वतः पाठीशी उभे राहिले होते. मी आलो होतो, आम्ही सगळे होतो. जयंतराव आल्यावर तुम्हाला आणखी कोण यायला पाहिजे', अशा शब्दांत खडसावले. तांबोळी यांच्याशी ऍड. बाबासाहेब मुळीक यांचाही खटका उडाली. तासगावचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देसाई यांनी कार्यकर्ते संकटात असताना राष्ट्रवादीने जिल्हा म्हणून पाठीशी रहावे, अशी अपेक्षा व्यक्त करत सल बोलून दाखवली. 

दरम्यान, सोमवारच्या अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील यांच्या दौऱ्याचे योग्य फलित निघावे, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत व्यक्त केली. गोलगोल गप्पा थांबवून दुखण्यांवर विलाज काढा, अजितदादा आणि तटकरेंना सांगून "ऑपरेशन' करा, अशी मागणी केली. 

बजाज-पाटील संयम 
राष्ट्रवादी शहरमध्ये संजय बजाज आणि कमलाकर पाटील यांच्यात संघर्ष सुरू आहे. आज दोन्ही गटांनी संयमाने घेतले. राज्य उपाध्यक्ष इलियास नायकवडी, मनोज शिंदे, शरद लाड, हणमंतराव देशमुख, संगीता हारगे, साधना कांबळे, वसुधा कुंभार, राहुल पवार आदी उपस्थित होते. 

अजितदादा कडक, जयंतराव गोडबोले 

इलियास नायकवडी यांनी टोलेबाजी केली. ते म्हणाले, ""पाण्याच्या टाकीत मांजर मरून पडलेय. नुसते पाणी उपसून वास जाणार नाही. ते मेलेलं मांजर पण बाहेर काढलं पाहिजे. जिल्ह्यात राष्ट्रवादीची स्थिती अशीच आहे. दाढीतला एकेक पांढरा केस वेचून उपसण्यापेक्षा वस्तरा फिरवला पाहिजे. अजित पवार एक घाव दोन तुकडे करतात. ते इथले विषय संपवतील, नाहीतर गोड बोलायला जयंतराव आहेतच की!'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com