बालेकिल्ल्यापासूनच वाताहत रोखण्याचे जयंत पाटील यांच्यासमोर आव्हान

बलराज पवार
बुधवार, 9 मे 2018

राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचा आज सांगलीत नागरी सत्कार होत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर होणारा हा सत्कार राष्ट्रवादीला पुन्हा बळकटी आणणारा ठरेल. तसेच गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात झालेली पक्षाची पीछेहाट झाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाला नवी उभारी देण्याची अपेक्षा त्यांच्याकडून पक्षाला आहे. अर्थात स्वत:च्या जिल्ह्यातूनच याची सुरुवात करणे, हेच मोठे आव्हानही असणार आहे.

माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगलीत आज सत्कार होत आहे. गेल्या महिन्यात हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीने जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन केले होते. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चार वर्षांपूर्वी सांगली जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. जिल्हा परिषद, मध्यवर्ती बॅंकेपासून सर्व महत्त्वाच्या संस्था आर. आर. पाटील आणि जयंत पाटील या जोडगोळीने ताब्यात ठेवल्या होत्या.

मात्र, मोदी लाटेचा फटका राष्ट्रवादीलाही बसला. तसेच आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर  गेल्या चार वर्षांत पक्षाची मोठी पीछेहाट झाली. जिल्हा परिषदेसारख्या मोठ्या संस्थांवर भाजपचा झेंडा फडकला. अगदी जयंत पाटील यांच्या ताब्यातील इस्लामपूर नगरपालिकेवरही. तीच स्थिती राज्यातही राष्ट्रवादीची झाली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची वाताहत कशी रोखणार, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांमध्ये होता.

पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत आहे. या पार्श्‍वभूमीवर जयंत पाटील यांना आपला  अनुभव पणाला लावून पक्षाला नवसंजीवनी द्यावी  लागणार आहे. त्यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषित, अभ्यासू नेत्याकडे राज्याची सूत्रे देऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सर्व विरोधकांसमोर आव्हान उभे केले आहे. जयंत पाटील यांच्याकडे राज्याची सूत्रे आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मात्र पक्षाला पुन्हा बळकटी देण्यासाठी त्यांना मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. 

दहा वर्षांपूर्वी जयंत पाटील यांनी भाजपसह विरोधकांची आघाडी करून महापालिकेची सत्ता मिळवली होती. मात्र यंदा स्वबळाची ताकद आजमावून महापालिका लढवावी लागणार आहे. सध्या तरी शहराध्यक्ष संजय बजाज आणि विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील हे दोन्ही गट एकत्र आल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते. मात्र जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदी  विराजमान झाल्याने त्यांनीही तूर्तास पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Sangli News Jayant Patil as NCP state President special