मुख्यमंत्री बोलू देत नाहीत, माईक बंद पाडतात - जयंत पाटील

मुख्यमंत्री बोलू देत नाहीत,  माईक बंद पाडतात - जयंत पाटील

इस्लामपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर चर्चा सुरू असताना प्रसंगी माईक बंद करतात. विरोधकांना बोलूच देत नाहीत. थातूरमातूर उत्तरे देऊन मूळ मुद्द्याला बगल देतात. ही त्यांची ‘स्टाईल’च आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

ते म्हणाले, ‘‘राणेंना मंत्रिपद देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. हेच मुख्यमंत्री शिवसेनेला एक आणि राणेंना वेगळेच सांगतात. दोघांनाही खेळवताहेत. राणेंना मंत्रिमंडळात घेण्याची वेळ शिवसेनेवर आली तर नक्कीच शिवसेनेचे भाजपमध्ये काही तरी ‘घोंगडे’ अडकले आहे, अशा शंकेला वाव आहे. राणेंसाठी कुणाच्या बाजूने विश्‍वासार्हता जपायची, हा त्यांच्यासमोर पेच असावा. सत्तेत किंमत मिळत नसूनही शिवसेना सत्तेत का राहिली आहे, हा प्रश्नच आहे. शिवसेनेला विश्‍वासात घेऊन सरकारचे कोणतेही निर्णय होताना दिसत नाहीत. अधिवेशनात शिवसेना तटस्थ, बघ्याच्या भूमिकेत होती.’’

ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांचा गृह विभागावर वचक नाही. काही अट्टल गुन्हेगार त्यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. दोन वर्षांपूर्वी अशा गुन्हेगारांवर कारवाईचे आश्‍वासन देऊनही ते पाळले नाही. त्याचा जाब विचारला तर, त्यांनी दुर्लक्ष केले. गुन्हेगार पोलिसांचा मुद्दाही टाळला. त्यांच्या मंत्रिमंडळातील २२ मंत्री वेगवेगळ्या भ्रष्टाचार प्रकरणात अडकले आहेत. त्यांना क्‍लीन चिट दिली. अडचणीचे प्रश्न आले, की ते बगल देतात. मागचे काही काढू नका, असे म्हणतात. पार्टी चालवणे इतकाच उद्योग सुरू आहे. पैसे नाही आणि विकासही नाही.’’

गुजरात निवडणुकीबाबत ते म्हणाले, ‘‘लाट नसेल तर भाजप साम, दाम, दंड, भेद वापरून कसा विजय मिळवते, हे गुजरात निवडणुकीत देशाने अनुभवले आहे. लोक महागाईने त्रस्त आहेत. तूरडाळ ६० रुपये होती तेव्हा आंदोलन करणारे हीच डाळ १५० रुपयांवर गेली तरी गप्प आहेत. उसाला ३४०० दर मिळत होता तेव्हा गोळीबार झाला. आज ३१०० मिळतोय तरी दुर्लक्ष आहे. पायावर गोळ्या घाला, असे म्हणणाऱ्या मंत्र्यांतील बेमुवर्तखोरपणा वाढला. सामान्यांमध्ये सरकारविरोधात असंतोष आहे. वारेमाप घोषणा; पण कामांना निधी न देण्याची कार्यपद्धती हळूहळू लोकांना कळू लागली आहे.’’

ते म्हणाले, ‘‘हल्लाबोल यात्रेमुळे राष्ट्रवादीमध्ये विदर्भात चैतन्य निर्माण झाले. फसवी कर्जमाफी आणि निवडणुकीतील खोटी आश्‍वासने यामुळे लोक संतप्त आहेत. अधिवेशनात याचे पडसाद उमटले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला पुन्हा आश्‍वासन द्यावे लागले. बोंडअळी व तुडतुडयासाठी मदत जाहीर करावी लागली. बियाणे कंपन्या, विमा कंपनी व केंद्राच्या मदत योजनेतून भरपाई देण्याची फसवी का होईना, घोषणा कृषिमंत्र्यांनी केली. भ्रष्ट मंत्री मुद्दा ऐरणीवर आला. प्रकाश मेहता फिरकलेच नाहीत. एसीबीकडे तपास देण्याचा निर्णय घ्यावा लागला.’’

सत्ताधाऱ्यांत अस्वस्थता
सरकारमध्ये एकसंधपणा नाही. शिवसेनेला वाटते की ते सत्तेतून बाहेर पडले की आम्ही सत्तेत जाऊ; पण राष्ट्रवादीला सत्तेत रस नाही. आमचे नेते शरद पवार यांनी सुरुवातीला पाठिंब्याचे विधान केल्यामुळे दोघांत अस्वस्थता वाढली, ती आजही कायम आहे, असेही ते म्हणाले.

साखरेचे दर कोसळतील
जयंत पाटील म्हणाले, ‘‘सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही. बाजारपेठेत साखर प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. पुढील वर्षी हे प्रमाण आणखी वाढेल. साखरेचे दर कोसळतील. कारखानदार सरकारवर अवलंबून आहेत. दर अजिबातच वाढू न देण्याची सरकारची मानसिकता आहे.’’

शेट्टी व आमचे धोरण एकच!
तिसऱ्या आघाडीच्या पर्यायाविषयी माहिती नसल्याचे सांगत श्री. पाटील यांनी सरकारकडून शेतकऱ्यांची झालेली फसवणूक या मुद्द्यावर खासदार राजू शेट्टी आणि आमचे धोरण समान आहे. भविष्यात एकत्र काम करण्यावरून आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही, असे स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com