जयंतराव पाटील यांच्या निवडीनंतर सांगली, इस्लामपूरात जल्लोष 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

सांगली - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांची आज निवड झाल्याचा आनंद येथे पेढे वाटून, फटाक्‍यांची आतषबाजी करून साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेसमोरील पक्षाच्या कार्यालयात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

सांगली - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांची आज निवड झाल्याचा आनंद येथे पेढे वाटून, फटाक्‍यांची आतषबाजी करून साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेसमोरील पक्षाच्या कार्यालयात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

जयंत पाटील यांची निवड होणार, हे कालपासूनच चर्चेत होते. त्याबद्दल सांगलीत प्रचंड उत्सुकता होती. त्यांची निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात गर्दी केली. महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष विनया पाठक, विधानसभा शहर क्षेत्राध्यक्ष सागर घोडके, उत्तम कांबळे, दिग्विजय सूर्यवंशी आदी प्रमुखांच्या उपस्थितीत पेढे वाटण्यात आले. 

याआधी दिवंगत आर. आर. पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद भूषवले होते. आता विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जयंतरावांकडे पक्षाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याबद्दल कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करतानाच महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी अत्यंत योग्य नेत्याची निवड झाल्याची भावना व्यक्त केली. 

इस्लामपूरात मोटारसायकलवरून रॅली

इस्लामपूर - माजी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आज दुपारी १.४५ वाजता निवड जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहरात प्रमुख मार्गावरून मोटारसायकल रॅली काढून फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

आज पुणे येथे पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठकीत पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिलीपराव वळसे पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यांची निवड होणार याची आधीच जोरदार चर्चा असल्याने कार्यकर्त्यांना मोठी उत्सुकता होती. दुसरीकडे जल्लोषाची जोरदार तयारी देखील केली होती. काही कार्यकर्ते या घटनेचा साक्षीदार होता यावे यासाठी पुण्यात देखील पोचले होते. निवड जाहीर होताच दोन वाजल्यापासून शहरात विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाजवळ कार्यकर्ते जमले. यल्लम्मा चौक, गांधी चौक, संभाजी चौक, आझाद चौक, शिराळा नाका, लाल चौक, महावीर चौक, उरुण परिसर अशी रॅली निघाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला. शहर अध्यक्ष शहाजी पाटील, खंडेराव जाधव, चिमन डांगे, सदानंद पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२ तारखेला नागरी सत्कार
लोकनेते राजारामबापू पाटील जनता पक्ष आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांचे सुपुत्र जयंत यांनाही या पदावर कामाची संधी मिळाली आहे. जयंत पाटील यांचे २ तारखेला इस्लामपुरात आगमन होणार असून या दिवशी त्यांचा नागरी सत्कार घेण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसने केले असल्याचे शहाजी पाटील, खंडेराव जाधव यांनी सांगितले.

Web Title: Sangli News Jayantarao Patil Selection celebration