निवडणुक आयोग मोदींच्या प्रभावाखाली - जयंत पाटील 

संतोष कणसे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये जावून सरकारी योजनांची उद्‌घाटने करायला मिळावीत म्हणूनच निवडणुक आयोगाने गुजरात निवडणुक जाहीर केली नाही. याचा अर्थ निवडणुक आयोग मोदींच्या प्रभावाखाली आहे, असा आरोप आमदार जयंत पाटील यांनी येथे केला.

कडेगाव - निवडणुक आयोगाने हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर करुन बरेच दिवस झाले, तरीही गुजरातची निवडणुक जाहीर केली नाही. पुर्वी दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकाचवेळी झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये जावून सरकारी योजनांची उद्‌घाटने करायला मिळावीत म्हणूनच निवडणुक आयोगाने गुजरात निवडणुक जाहीर केली नाही. याचा अर्थ निवडणुक आयोग मोदींच्या प्रभावाखाली आहे, असा आरोप आमदार जयंत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

कच्चला जाणारी बोट नरेंद्र मोदींनी हस्ते नुकतीच सोडण्यात आली. तो कार्यक्रम होण्यासाठी निवडणुक आयोग वाट पाहत होते, असेही ते म्हणाले. 

श्री. पाटील म्हणाले, देशभरात भाजप सरकार विरोधात लोकांचा कल वाढ वाढत आहे. विरोधक किती प्रभावी आहेत. यापेक्षा हा माणूस नको, अशी लोकांची धारणा झाली आहे. त्यामुळे राहूल गांधींना लोकांचा प्रतिसाद वाढला आहे. राहुल गांधीच्या बोलण्याला लोक रिट्विट करीत आहेत. त्यामुळे आता देशातील वातावरण बदलेल असे वाटते. नोटाबंदीमुळे देशात आर्थिक अधोगती आली आहे. त्याचा फटका तळागाळात बसला आहे. लोकहितापेक्षा जाहिरातबाजीवर शासनाचे जास्त लक्ष आहे. तर आता सोशलमिडीया शासनाच्या विरोधात गेला, असून सोशल मिडीयाने शासनाविरुध्द कडवट भूमिका घेतली आहे. त्यामुळे सरकारविरुध्द जनमत तयार झाले आहे. 

कर्जमाफीसाठी 79 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. परंतु दहा टक्के तरी लोकांना कर्जमाफीचा फायदा होईल की नाही, हे सांगता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली, त्यांची नावे कर्जमाफीच्या यादीतच नाही. असे हे शासन ऑनलाईन आहे. एसटी संप वेळीच मिटवता आला असता, तो मिटवला नाही. सरकारने सोशल मिडीयावर जाहिरातीसाठी 300 कोटींचे बजेट आहे. हे पैसे एस. टी. महामंडळाला दिले असते, तर संप मिटला असता. संपाच्या काळात जो अतिरिक्त खर्च झाला, तो 1 हजार कोटींचा असेल. वीज मंडळात संकटात, एसटी अडचणीत. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, असेही श्री. पाटील म्हणाले. 

राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबत डॉ. पतंगराव कदम यांनी वक्तव्य केले आहे. यापुढे कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपचा टिकाव लागणार नाही. सांगली महापालिका निवडणुकीसंदर्भांत बोलताना ते म्हणाले, सांगलीत राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. तरीसुध्दा स्वबळावर की एकत्र, याबाबत अजून विचार केला नाही. निवडणुक पुढे असून पक्ष वाढविण्याला प्राधान्य दिले आहे. स्वबळावर लढले, तर काय होईल याचा अंदाज आम्ही घेतला आहे. असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीतून जे भाजपमध्ये गेले आहेत. तेथे त्यांचे मत विचारात घेतले जात नाही. मुळ भाजपचे इनर कोअरमध्ये जे लोक आहेत. तेच निर्णय घेतात. बाहेर येवून यांना निर्णय सांगतात. मूळ निष्ठावंतांनाच वर काढण्याचा भाजपचा प्लॅन आहे, असेही श्री. पाटील म्हणाले. 

जेजेपी नव्हतीच पण ते बीजेपीत रमलेत. 
"जेजेपी' काय आहे या प्रश्‍नावर बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीतील आमचे सहकारी स्वत:हून भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे काही लोकांचा असा समज होता की, ते जयंत पाटील यांचेच लोक आहेत. आता त्यांची वेगळी पार्टी झाली आहे. त्यांच्या ताकदीप्रमाणे त्यांचे भागात लोक निवडून येत आहेत. माझा पक्ष मी माझ्या हाताने कसा दुबळा करीन. ते स्वत: गेले आहेत. त्यामुळे जेजेपी नव्हतीच पण ते आता बीजेपीत रमलेत. 

Web Title: Sangli News Jayat Patil Press