सलून चालक वडिलांच्या जिद्दीवर...मुलींचा शड्डू

सलून चालक वडिलांच्या जिद्दीवर...मुलींचा शड्डू

सांगली - केशकर्तनाचे काम करून पोट भरणाऱ्या एखाद्यानं दोन्ही मुलींना कुस्तीपटू घडवण्याचा ध्यास घेतला तर..? असा ध्यास संजयनगरच्या कानिफनाथ शिंदे या पूर्वाश्रमीच्या कुस्तीगिराने घेतलाय. त्यांच्या मुली ज्योती व मयूरी राज्य स्तरापर्यंत मैदाने गाजवू लागल्यात. ‘दंगल’ चित्रपटामुळे महावीर फोगट या कुस्तीगीर वडिलांची कथा सर्वांसमोर आली. कानिफनाथ यांची धडपडही त्यापुढची प्रेरणादायी कथा घडविण्यासाठी आहे.

सोलापूर जिल्ह्यातील तारापूरचे कानिफनाथ यांच्या घरात पैलवानकीची परंपरा वडिलांपासून. ती पुढे चालवावी अशी त्यांची इच्छा. चार मुली, एकच मुलगा. मुलगा पैलवान होईल याची वाट न पाहता थोरल्या दोन मुलींना त्यांनी आखाड्यात उतरविले. चार वर्षे दोघी पहाटेपासून सराव करतात. ज्योतीने गेल्या वर्षी मुंबईतील खाशाबा जाधव चौथ्या राज्यस्तरीय स्पर्धेत ५३ किलो गटात कांस्यपदक मिळविले.

मयूरीनेही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कनिष्ठ विभागात ४६ किलो वजन गटात यश मिळविले. दोघीही शांतिनिकेतनमध्ये मॅटवर सराव करतात. सुनील चंदनशिवे, रुक्‍साना मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ज्योतीने सहावीपासून, तर मयूरीने आठवीपासून आखाड्यात पाऊल टाकले. पाच-सहा वर्षांपासून दोघींचा महिन्याचा खर्च दहा हजारांवर आहे. सलूनमधील मिळकतीवर ते तो करतात. कानिफनाथांची तारांबळ उडते. या धडपडीला आधार म्हणून दोघीही तीन-चार वर्षांपासून गावोगावच्या यात्रांचे फड गाजवताहेत. त्यांना चांगली दाद मिळतेय. मात्र, आंतराष्ट्रीय स्तरावर मजल मारण्यासाठी त्यांच्या स्वप्नांना हवेत मदतीचे पंख.

कोल्हापूरचे दादा लवटे यांनी दोघींनाही पुढील प्रशिक्षण द्यायची तयारी दर्शवली. तिथे पाठवायचे तर महिन्याचा खर्च मोठा आहे. माझ्या परीने प्रयत्न करतोय. क्रीडाप्रेमींनीही मदत करावी, 
ही अपेक्षा.
- कानिफनाथ शिंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com