श्रद्धेपोटी खटावला नाही मंदिरापेक्षा उंच इमारत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

खटाव (ता. मिरज) येथे बुधवार (ता. २२)पासून यल्लम्मा यात्रा सुरू झाली. त्यानिमित्त गावातील वैशिष्ट्यपूर्ण प्रथेविषयी...

आरग - जागतिकीकरणाच्या रेट्यात खेडीही ढवळून निघालीत. त्यांचा चेहरा-मोहरा बदलला. मात्र अनेक गावांनी वैशिष्ट्यपूर्ण प्रथा-परंपरा जपल्या आहेत. मिरज तालुक्‍यातील खटाव त्यापैकी एक. अनेक वर्षांत गावाने माडी (अनेक मजली)चे एकही घर बांधले नाही. ग्रामदैवत सोमेश्‍वर मंदिराच्या शिखरापेक्षा उंच घर बांधायचे नाही ही त्यामागची श्रद्धायुक्त भूमिका. 

मिरज शहरापासून अवघ्या २५ किलोमीटरवर कर्नाटक सीमावर्ती भागातील खटाव. सगळा गाव कन्नड बोलतो. लिंगायत समाजाचे संख्याबळ अधिक. सोमेश्‍वर ग्रामदैवत त्यांचे श्रद्धास्थान. गावच्या पूर्वेला चिंचेच्या बनात देखणे मंदिर आहे. लाखो रुपये खर्चून चित्तवेधक शिखर आणि देखणा मंडपा उभारला आहे. सगळीकडे जुनी पांढऱ्या मातीची घरे असल्याने सुडौलपणा, आखीव-रेखीवपणा नाही. मंदिर मात्र पाहण्यासारखे. गावात दुमजली घर बांधायचे नाही ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही लोकांनी श्रद्धेने जपली जाते.     

नवी पिढी शिक्षणाच्या मार्गावर गेल्याने सरकारी नोकरदारांची संख्या मोठी आहे. तालुक्‍यात कदाचित सर्वाधिक प्राध्यापक, शिक्षक येथे असावेत. सधनता येताच सुंदरशा दुमजली घराचे स्वप्न तरुण पाहतात. खटावला मात्र या स्वप्नाची भुरळ पडण्यापासून श्रद्धेने रोखले. 

दोन-अडीच हजार लोकसंख्येच्या या गावात दोन-तीनशे घरे गावभागात आहेत. एकाही घराला दुसरा मजला नाही. माळभागातील घरेही बैठी आहेत. द्राक्ष, ऊस शेतीतून रग्गड पैसा येऊनही माडीच्या घराचे स्वप्न कोणी पाहिले नाही. काही दशकांपूर्वी एकाने दुमजली घर बांधले. मात्र, काही वर्षांत ते पाडून टाकले. कारण अस्पष्ट राहिले. नवी पिढी दुमजली घरासाठी आग्रही राहिली. पण गावच्या परंपरेमुळे टुमदार घराच्या इच्छेला मुरड घालण्याऐवजी त्यांनी गाव सोडणे पसंत केले. अनेक कुटुंबे सांगली-मिरजेसह वेगवेगळ्या गावात राहतात. माडीच्या घराचे स्वप्न त्यांनी गावांत नाही, पण परगावी पूर्ण केले.

आता गावात याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. सोमेश्‍वराला कौल लावून शिखराची उंची वाढवण्याबाबत चर्चा झाली. शिखराची उंची वाढली, की घरांची उंचीही वाढवता येईल. पर्यायाने दोन, तीन मजली घरे बांधता येतील, असा गावकऱ्यांचा विश्‍वास आहे. खटाव यानिमित्ताने एका जुन्या परंपरेचे सीमोल्लंघन करेल. 

पांढर, पाया आणि तंत्रज्ञान
खटावला गावठाणात पांढऱ्या मातीचे प्रमाण जास्त आहे. भोवताली सर्वत्र पांढऱ्या मातीचे ढिगारे, टेकड्या दिसतात. पांढऱ्या मातीत घराचा पाया खोलवर मिळू शकत नाही, हे शास्त्रीय कारण असावे. त्यामुळेही उंच आणि दुमजली घरे बांधली जात नसावीत. त्याला परंपरा आणि श्रद्धेचा मुलामा दिला गेला असावा. घरबांधणीच्या नव्या तंत्रांनी पांढऱ्या मातीतही मजबूत घरे बांधता येतात. त्यामुळे खटावकरांची परंपरा मागे पडू शकते.

Web Title: Sangli News Khatav Yallama Festival special