कोरेगाव भीमा प्रकरणाचा सांगलीत मोर्चाने निषेध 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दगड नाही तर पेन उचलायला शिकवला. तोडफोड करून ताकद दाखवायची नाही. शासनकर्ती जमात होऊन ताकद दाखवायची आहे.

- विवेक कांबळे

सांगली - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दगड नाही तर पेन उचलायला शिकवला. तोडफोड करून ताकद दाखवायची नाही. शासनकर्ती जमात होऊन ताकद दाखवायची आहे. पण, कुणी कमजोर समजून डिवचण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांनी छाव्यांशी गाठ आहे, हे ध्यानात घ्यावे, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे प्रदेश कार्याध्यक्ष विवेक कांबळे यांनी आज येथे दिला. 

कोरेगाव भीमामधील घटनेचा निषेध आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मिरज शहरातून विवेक कांबळे यांच्या समर्थकांनी मोटारसायकल फेरी काढून शक्तीप्रदर्शन केले. विश्रामबाग चौकात शहरासह जिल्हाभरातून रिपाईचे कार्यकर्ते जमले होते. दुपारी दोनच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सभेत रुपांतर झाले. श्री. कांबळे यांनी कार्यकर्त्यांना संयम आणि शांततेने या परिस्थितीला सामोरे जाण्याचे आवाहन केले. 

ते म्हणाले,""पिढ्यान्‌ पिढ्या अन्याय सहन करून आपण इथवर आलोय. डॉ. आंबेडकर यांच्यावर मनुवाद्यांनी अन्याय केला, मात्र त्यांनी अन्यायालाच ताकद बनवले. आपण त्याच विचाराने वागले पाहिजे. त्यांनी लिहलेली घटना हीच ताकद आहे. ती बदलण्याचा काहींचा विचार आहे, ती कूटनिती हाणून पाडू. परंतू, सारे शांततेच्या मार्गाने जात असताना जाती-धर्माच्या नावाने कुणी तरुणांची डोकी भडकावत असेल तर विरोध केलाच पाहिजे.'' 

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी शिष्टमंडळाची भूमिका समजून घेतली. ती राज्य शासनाकडे पाठवण्याची ग्वाही दिली. जिल्ह्यात शांतता नांदावी, यासाठी सहकार्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, संजय कांबळे, नानासाहेब वाघमारे, अपर्णा वाघमारे आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा झाला. 

Web Title: Sangli News Koregaon Bhima Riots agitation in sangli