कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी भिडेंचे कार्यकर्ते चौगुलेंची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

सांगली - कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांचे बिनीचे कार्यकर्ते नितीन चौगुले यांची पुणे ग्रामीण पोलिसांनी चौकशी केली. सुमारे वीस जणांचे पथक काल दिवसभर सांगलीत होते. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले भिडे गुरुजी मात्र दिवसभर त्यांच्या नित्य पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे शिराळा-इस्लामपूर दौऱ्यावर होते. 

सांगली - कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांचे बिनीचे कार्यकर्ते नितीन चौगुले यांची पुणे ग्रामीण पोलिसांनी चौकशी केली. सुमारे वीस जणांचे पथक काल दिवसभर सांगलीत होते. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले भिडे गुरुजी मात्र दिवसभर त्यांच्या नित्य पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे शिराळा-इस्लामपूर दौऱ्यावर होते. 

पोलिसांनी सुमारे दोन तास चौकशी केली. त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले. कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट लागले होते.

दरम्यान, याप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजीराव भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी एकबोटे यांना अटक झाली आहे. भिंडेंवर मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. दोन दिवसापूर्वी त्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली होती.

त्यांच्यावरील दाखल गुन्ह्याबाबत २८ मार्चला सांगलीत मोर्चा काढण्यात येणार आहे. गेले दोन दिवस शिवप्रतिष्ठानकडून विविध पक्षीय कार्यकर्ते संघटनांशी संपर्क साधून मोर्चा यशस्वी करण्याचे नियोजन सुरू  आहे. राज्य सरकार भिडे यांच्यावर कारवाई करण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याबद्दल पुरोगामी संघटनांनी २६ मार्चला मुंबईत एल्गार मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. एकूणच या मुद्द्यावरून राजकारण तापत असताना आजवर भिडे यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनी आज सांगलीत येऊन चौकशी करून सरकारला विधानसभेत निवेदन करण्यासाठी आवश्‍यक ती सोय  केली आहे.

दरम्यान कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे व त्यांच्या कार्यकर्त्यांची चौकशी करण्यासाठी पोलिस आले असले तरी आज गुरुजी मात्र बाहेरगावीच होते. त्यांची पोलिस चौकशी करणार किंवा नाही याबाबत खुलासा  होऊ शकला नाही. पोलिसांनी आज दिवसभर शिवप्रतिष्ठानच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. दुपारी प्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांची चौकशी केली.

तब्बल दोन तास बंद खोलीत ही चौकशी झाल्याचे समजते आहे. श्री. भिडे मोबाईल वापरत नसल्याने त्यांचे मोबाईल लोकेशन स्पष्ट होत नाही. दंगल काळात ते  नेमके कोठे होते याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. फिर्यादीत मात्र भिडे यांनी दगड फेकून मारल्याचा जबाब एका महिलने दिला आहे. भिडे यांनी त्या महिलेचीच चौकशी करावी, अशी जाहीर मागणी केली आहे. एकूणच भिडे यांच्‍या चौकशीचे पोलिसांपुढे आव्हानच आहे. दरम्‍यान, रात्री उशिरा इस्‍लामपूरमध्‍ये दिलीप पाटील व संजय बजाज यांचा जबाब घेतला.

Web Title: Sangli News Koregaon Bhima Violance isssue