कोरेगाव-भीमा दंगलीवेळी भिडे इस्लामपुरात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

सांगली - कोरेगाव-भीमा दंगलीवेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे हे इस्लामपुरात होते, असे पोलिस तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. भिडेंची चौकशी करण्यासाठी आलेल्या पुणे ग्रामीण विभागाच्या पोलिसांनी काल (गुरुवारी) त्यांच्या कार्यकर्त्यांची चौकशी केली. तर रात्री परत जाताना त्यांनी इस्लामपुरात राष्ट्रवादीच्या नेत्याकडेही चौकशी केली. याबाबतीत पूर्ण गोपनीयता पाळण्यात येत आहे.

कोरेगाव भीमा येथे या वर्षीच्या सुरवातीसच झालेल्या दंगली प्रकरणी संभाजीराव भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. एका महिलेने दिलेल्या फिर्यादित संभाजीराव भिडे यांना दगड मारताना पाहिल्याचे म्हटले आहे. त्या अनुषंगाने श्री. भिडे दंगलीवेळी कुठे होते? 

दंगलीस ते कारणीभूत आहेत का? याची माहिती घेण्यासाठी काल (गुरुवार) पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक सांगलीत आले होते. त्याबाबत त्यांनी पूर्ण गोपनीयता बाळगली होती,  मात्र त्यांची संभाजीराव भिडेंशी भेट झाली नाही. श्री.  भिडे बैठकांसाठी बाहेर असल्याची माहिती मिळाल्याने ते चौकशीसाठी उपलब्ध 
झाले नाहीत. 

दरम्यान, पोलिसांनी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन  चौगुले यांना बोलावून घेऊन त्यांची सुमारे दोन तास चौकशी केली. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे एका पदाधिकाऱ्याचीही चौकशी झाली. यावेळी कासेगाव येथे एक जानेवारीस राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्री कुसुमताई पाटील यांच्या रक्षाविसर्जन विधीस शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे उपस्थित होते.

ते सुमारे चार तास कासेगाव येथे  उपस्थित असल्याचे पुरावेही पोलिसांना देण्यात आल्याचे समजते. यानंतर रात्री उशिरा परत जाताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने इस्लामपुरात राष्ट्रवादीच्या  नेत्याकडेही चौकशी केली. त्यांच्याकडूनही त्यांनी संभाजीराव भिडेंबाबत माहिती घेतल्याचे समजते. मात्र या चौकशीबाबत गोपनीयता बाळगल्याने कुणीही चौकशी संदर्भात बोलण्यास नकार दिला.

Web Title: Sangli News Koregaon Bhima Violance isssue