पाऊस रुसल्याने कृष्णा कोरडी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

सांगली - पावसाळा सुरू होऊन तीन आठवडे होत आले तरी अद्याप पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. हवामान खात्याचे अंदाज चुकू लागले आहेत. कृष्णा नदीही कोरडी पडली असून सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी केवळ सव्वा फूट इतकीच आहे. तर धरणांमध्येही पाणीसाठी कमी झाला आहे. 

सांगली - पावसाळा सुरू होऊन तीन आठवडे होत आले तरी अद्याप पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. हवामान खात्याचे अंदाज चुकू लागले आहेत. कृष्णा नदीही कोरडी पडली असून सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी केवळ सव्वा फूट इतकीच आहे. तर धरणांमध्येही पाणीसाठी कमी झाला आहे. 

यंदा मे महिन्यात वळवाच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. मात्र प्रत्यक्ष पावसाळा सुरू होऊन जून महिना संपत आला तरी पावसाने ओढ दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात दुष्काळी तालुक्‍यात पावसाने दमदार सलामी दिली. मात्र त्यानंतर गेले पंधरा दिवस पाऊस रुसला आहे. त्यामुळे धरणे आणि नदीतील पाणी पातळी कमी होत चालली आहे. सांगलीत कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडत चालले आहे. आयर्विन पुलाच्या पश्‍चिमेस अमरधाम स्मशान भूमीच्या मागे नदी कोरडी पडली आहे. काही ठिकाणी डबक्‍यासारखे पाणी दिसते. तर पुलाजवळ केवळ सव्वाफूट पाणी पातळी आहे. 

जिल्ह्यात मृगाच्या आगमनापासून झालेल्या पावसाची टक्केवारी सुमारे 25 टक्के इतकीच होते. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र गेल्या दोन आठवड्यांत पावसाने पाठ फिवल्यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. खरिपाची पेरणी फक्त 20 टक्के झाली आहे. मशागतीची कामे करून तो चांगल्या पावसाकडे डोळे लावून बसला आहे. 

अजूनही 169 टॅंकर सुरू 
उन्हाळ्यात सुरू असलेल्या टॅंकरची संख्याही फारशी कमी झालेली नाही. पाऊस नसल्याने 169 गावातील नागरिकांना पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून रहावे लागत आहे. यामध्ये जत तालुक्‍यात 82, कवठेमहांकाळमध्ये 22, तासगावमध्ये 24, खानापुरात 20, आटपाडीत 17 आणि शिराळा तालुक्‍यात 2 टॅंकर सुरू आहेत. यावरून पावसाळा सुरू झाला तरी पाण्याची टंचाई लक्षात येते. 

धरणांमध्ये पाणीसाठा आटला 
धरणांमधील पाणीसाठाही आटला आहे. 105 टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात केवळ 16 टीएमसी पाणी आहे. तर वारणा धरणात 10 टीएमसी पाणी आहे. 

Web Title: sangli news Krishna River