कुंडलापूरचा ग्रामसेवक अखेर निलंबित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

सांगली - कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील ‘एलईडी’ बल्ब खरेदी घोटाळा प्रकरणी ग्रामसेवक बाळू वगरे यांना निलंबित केले. ‘सकाळ’ ने एलईडी घोटाळ्यावर काही दिवसांपासून प्रकाशझोत टाकला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी वगरेंवर निलंबनाची कारवाई केली. घोटाळा प्रकरणी ग्रामसेवकासह इतरांवर वसुलीसाठी रकमेची जबाबदारी निश्‍चितीची प्रक्रिया दोन दिवसांत सुरू करण्याचे संकेतही दिले.

सांगली - कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील ‘एलईडी’ बल्ब खरेदी घोटाळा प्रकरणी ग्रामसेवक बाळू वगरे यांना निलंबित केले. ‘सकाळ’ ने एलईडी घोटाळ्यावर काही दिवसांपासून प्रकाशझोत टाकला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी वगरेंवर निलंबनाची कारवाई केली. घोटाळा प्रकरणी ग्रामसेवकासह इतरांवर वसुलीसाठी रकमेची जबाबदारी निश्‍चितीची प्रक्रिया दोन दिवसांत सुरू करण्याचे संकेतही दिले.

कुंडलापूर येथील ग्रामसेवक वगरे आणि संबंधितांनी ‘एलईडी’ बल्ब खरेदीत घोटाळा केल्याची तक्रार माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी जिल्हा परिषदेकडे  केली होती. या घोटाळ्याची माहिती मिळताच जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींवरही गावकारभाऱ्यांनी घोटाळा केल्याबाबत ‘सकाळ’ने फोकस टाकला. हा घोटाळा उजेडात आणल्यानंतर जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतीमध्ये याची चर्चा सुरू झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी कुंडलापूर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच बल्ब खरेदी करणाऱ्या इतर ग्रामपंचायतींचीही चौकशी करण्यास सांगितले.

कुंडलापूरचा चौकशी अहवाल प्राप्त झाला. ग्रामसेवक वगरे, उपसरपंच वत्सला सोरटे आणि ठराव करणाऱ्या सदस्यांनी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता न घेताच एक लाख ६२ हजारांचे बल्ब बसविल्याचा खळबळजनक प्रकार चौकशीत उजेडात आला. त्यामुळे श्री. राऊत यांनी संपूर्ण रक्कम वसूल का करू नये, अशी नोटीस बजावली.

त्यांच्याकडून खुलासा मागविला. घोटाळाबहाद्दरांनी खुलाशासाठी मुदतवाढ मागितली. परंतु, मुदतवाढ अमान्य केली. ग्रामसेवक वगरे यांना आज सायंकाळी निलंबित केले. निलंबनाचा आदेश ग्रामपंचायतीकडे पाठविला. ग्रामसेवक वगरे यांच्या निलंबनानंतर आता एक लाख ६२ हजार रुपये वसुलीसाठीची प्रक्रिया दोन दिवसांत सुरू होणार आहे. प्राथमिक चौकशीत जे खुलासे प्राप्त झाले आहेत त्याआधारे कोणाकडून रक्कम वसूल करायची, याची जबाबदारी निश्‍चित केली जाईल. त्यानंतर वसुलीसाठी महिन्याची नोटीस दिली जाईल.

‘एलईडी’ बल्ब घोटाळ्याबाबत तक्रार केल्यानंतर ‘सीईओ’ राऊत यांनी कोणताही दबाव न स्वीकारता थेट चौकशीचे आदेश दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी प्राथमिक टप्प्यात ग्रामसेवकाचे निलंबन केले. त्यांच्या कारवाईचे स्वागत करतो. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींमधील घोटाळ्याची देखील चौकशी केली जावी.
- अजितराव घोरपडे, माजी राज्यमंत्री

सर्व ग्रामपंचायतींची चौकशी
जिल्हा परिषदेची अर्थ समितीची सभा आज झाली. ‘सकाळ’ मधील बातमीचा संदर्भ देत सदस्य डी. के. पाटील यांनी एलईडी बल्ब खरेदीबाबत प्रश्‍न उपस्थित केला. केवळ तक्रार आली तरच चौकशी न करता ज्या ग्रामपंचायतींनी बल्ब खरेदी केले आहेत, त्या सर्व खरेदी प्रक्रियेची चौकशी करा. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली. तेव्हा सभापती अरुण राजमाने यांनी चौकशीचे आदेश दिले.

कार्यकारिणी बरखास्तीची शक्‍यता
कुंडलापूरचे ग्रामसेवक वगरे चौकशीदरम्यान हस्तक्षेप करू नयेत यासाठी प्राथमिक चौकशीनंतर त्यांना निलंबित केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात संबंधित सदस्यांची कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्याप्रमाणे संबंधित कार्यकारिणी बरखास्त केली जाण्याची  शक्‍यता आहे.

Web Title: sangli news Kundalpur Gramsevak suspended

टॅग्स