खाडेंनी शिक्षण संस्थेसाठी जागा हडपली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मिरज - आमदार सुरेश खाडे यांनी शिक्षण संस्थेच्या नावाखाली शासकीय जागा ढापल्याचा आरोप करत काँग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांनी सभात्याग केला. भाजपचे सरकार गोरगरिबांचे कल्याण करण्याऐवजी त्यांच्या जागा हडपण्याची कामगिरी करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. पहिल्या वीस मिनिटांतच सभागृह रिकामे झाले. त्यानंतर अवघ्या चार-पाच सदस्यांच्या उपस्थितीत सभागृह चालवण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर आली. 

मिरज - आमदार सुरेश खाडे यांनी शिक्षण संस्थेच्या नावाखाली शासकीय जागा ढापल्याचा आरोप करत काँग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांनी सभात्याग केला. भाजपचे सरकार गोरगरिबांचे कल्याण करण्याऐवजी त्यांच्या जागा हडपण्याची कामगिरी करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. पहिल्या वीस मिनिटांतच सभागृह रिकामे झाले. त्यानंतर अवघ्या चार-पाच सदस्यांच्या उपस्थितीत सभागृह चालवण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर आली. 

आमदार खाडे यांच्या शिक्षण संस्थेसाठी पंढरपूर  रस्त्यावर मालगाव हद्दीतील जागा नियमबाह्य रितीने घेतल्याबद्दल सभेत गदारोळ झाला. सदस्य अनिल आमटवणे, कृष्णदेव कांबळे, अजयसिंह चव्हाण यांनी ग्रामपंचायत विभागाचे विस्ताराधिकारी गुरव यांना जाब विचारला. सरकारी जागा खासगी संस्था घशात घालत असताना प्रशासन फक्त बघत राहणार आहे काय ? असा सवाल केला.

ते म्हणाले,‘‘जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पाच एकर जागा शिक्षण संस्थेला मिळाली आहे; शेजारी शिल्लक राहिलेली साडेतीन एकर जागा त्यांनी ढापली आहे. संपूर्ण जागेला कुंपण घातले असून इतरांना  प्रवेशास मज्जाव केला आहे. मालगाव ग्रामपंचायतीने शासकीय जागेत वृक्षारोपण केले होते; खाडे यांच्या संस्थेने बुलडोझर लाऊन काढून टाकले. एकीकडे शासन वृक्षारोपणाला प्रोत्साहन देत असताना त्यांच्याच पक्षाचे आमदार वृक्षनिर्दालन करत आहेत.’’

कृष्णदेव कांबळे म्हणाले,‘‘भोसे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याने ग्रामसेवकाला हाताशी धरून या जागेसाठी नाहरकत पत्र दिले. सदस्यांनी या प्रक्रियेच्या चौकशीची मागणी केली.’’

प्रभारी गटविकास अधिकारी संजय शिंदे म्हणाले,‘‘प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करू आणि मग पुढील निर्णय घेऊ.’’ या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. अशोक मोहिते, आमटवणे, छाया हत्तीकर, रंगराव जाधव, जयश्री डांगे, अजयसिंह चव्हाण, सतीश कोरे यांनी भाजप सरकारचा निषेध केला. बेघरांच्या जागा लाटण्याचे आणि महागाईचे ओझे वाढवण्याचे काम भाजप सरकार करत असल्याचा आरोप करत सभागृह सोडले. सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 

रिकाम्या सभागृहात अवघे चार सदस्य होते. त्यांच्या उपस्थितीतच सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे यांनी सभा चालवली. नंतर भाजपचे काही सदस्य हजर झाले.

बुधगावचे विक्रम पाटील म्हणाले,‘‘भाजपचे सरकार लोककल्याणाचे काम करत असताना काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य राजकारणासाठी चुकीची भूमिका घेत आहेत. पक्षाचा अवमान सहन केला जाणार नाही.’’ 

 

Web Title: sangli news land acquisition issue