रिळ्यातील मंदिर भागात दोन बिबट्यांचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

बिळाशी - रिळे (ता. शिराळा) येथील भैरमदरा (भैरवनाथ) मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन बिबट्यांचे दर्शन होत असल्याची माहिती डोंगररांगांच्या परिसरात गवत काढण्यासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांनी रिळे गावातील नागरिक आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दिली.

त्यानुसार महादेव पाटील, माजी सरपंच शंकर पाटील, दिलीप जाधव, जगन्नाथ सपकाळ, हिंदूराव पाटील, भीमराव पाटील यांची एकूण सहा कुत्री व ज्ञानदेव पाटील यांच्या शेळीची बिबट्यांच्या हल्ल्यात शिकार झाल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य बाजीराव सपकाळ, तुकाराम पाटील, दीपक पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिली.  

भैरमदरा परिसरात मोरेवाडी, बेलेवाडी, रिळे, मांगरूळ असा सलग जंगलयुक्त डोंगराळ परिसर आहे. पंधरा दिवसांपूर्वीच फुपेरे येथील खिंडीचे टोक परिसरात दोन बिबट्यांचे दर्शन झाले होते. याच परिसरातून दोन बिबटे परिसरात आल्याचा ग्रामस्थांचा प्राथमिक अंदाज आहे. डोंगररांगांचा अखंड पट्टा कुसाईवाडी, शिंदेवाडी, मांगरूळ, बेलेवाडी, रिळे, तडवळे असा असल्याने जंगलही मोठे आहे. त्यामुळे या वन्यजीवांनाही चांगलाच आसरा मिळतो. बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक कुत्री व शेळ्यांची शिकार झाल्याने बिबटे मानववस्तीवरही हल्ला करतील की काय, या धास्तीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Sangli News Leopard seen in Shirala Taluka