मित्राच्या खून प्रकरणी दोघांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

सांगली - किरकोळ कारणावरून मित्राचा डोक्‍यात दगड घालून खून केल्याप्रकरणी दोघांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पंढरी शेडगे आणि राहुल सिंह अशी आरोपींची नावे आहेत.

सांगली - किरकोळ कारणावरून मित्राचा डोक्‍यात दगड घालून खून केल्याप्रकरणी दोघांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पंढरी शेडगे आणि राहुल सिंह अशी आरोपींची नावे आहेत. जिल्हा न्यायाधीश क्रमांक सहा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांच्यासमोर या  खटल्याची सुनावणी झाली. सरकारतर्फे सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिले.

मिरज रेल्वे स्टेशनजवळ ३१ जुलै २०१५ मध्ये गजानन ऊर्फ गजनी विलास पारसे (वय २५, रा. प्रेमनगर,  मिरज) हा त्याचे मित्र पंढरी लक्ष्मण शेंडगे (वय २१) आणि राहुल ऊर्फ गोऱ्या प्रवीण सिंह (वय २५, दोघेही रा. ख्वॉजा वस्ती, मिरज) यांच्यासह दुपारी तीन वाजता जेवण करून निघाला होता.

या वेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. यामुळे पंढरी शेंडगे आणि राहुल सिंह यांनी त्याच्या डोक्‍यात दगड घातला. यात गजानन पारसे जागीच ठार झाला. शेंडगे आणि सिंह हे मिरजेतील हॉटेल अनारकली येथे आचाऱ्याचे काम करत होते. त्याच हॉटेलमध्ये गजानन पारसे हा जेवण्यास जात होता. त्यातून त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर ते चांगले मित्र बनले होते.

घटनेची नोंद महात्मा गांधी पोलिस ठाण्यात झाली. गुन्ह्याचा तपास महिला पोलिस निरीक्षक संगीता माने यांनी केला. त्यांनी घटनास्थळावरून मृताच्या डोक्‍यात  घातलेला दगड आणि आरोपींची कपडे जप्त केले.  त्यानंतर यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

या खटल्याची सुनावणी सहावे जिल्हा न्यायाधीश वर्धन काकतकर यांच्यासमोर झाली. सरकारतर्फे १५ साक्षीदार तपासले. यातील फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

Web Title: Sangli News life imprisonment in friend murder case