वयोवृद्ध आई-वडिलांचे जगणेच मुश्‍कील केले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

सांगली - ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दिलीप लिमकर आणि स्नेहल लिमकर या दांपत्याची आणि वयोवृद्ध आई-वडिलांचे जगणेच मुश्‍कील केले आहे. सख्खा भाऊच पक्का वैरी बनल्याची दिलीप यांची तक्रार आहे. लाचखोरीत अटक झालेल्या सहायक फौजदार चंद्रकांत किल्लेदार व बाळासाहेब मगदूम या जोडगोळीने आतापर्यंत तक्रारीची दखलच घेतली नाही. पोलिस अधीक्षक कार्यालयातही निवेदने दिली. आदेश होऊनही कवठेमहांकाळचे संबंधित पोलिस कारवाई करत नाही. काल स्नेहल लिमकर यांचे टेलरिंगचे दुकान फोडल्यामुळे तक्रारीसाठी विषाची बाटली घेऊन थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत ते पोहोचले आहेत.

सांगली - ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दिलीप लिमकर आणि स्नेहल लिमकर या दांपत्याची आणि वयोवृद्ध आई-वडिलांचे जगणेच मुश्‍कील केले आहे. सख्खा भाऊच पक्का वैरी बनल्याची दिलीप यांची तक्रार आहे. लाचखोरीत अटक झालेल्या सहायक फौजदार चंद्रकांत किल्लेदार व बाळासाहेब मगदूम या जोडगोळीने आतापर्यंत तक्रारीची दखलच घेतली नाही. पोलिस अधीक्षक कार्यालयातही निवेदने दिली. आदेश होऊनही कवठेमहांकाळचे संबंधित पोलिस कारवाई करत नाही. काल स्नेहल लिमकर यांचे टेलरिंगचे दुकान फोडल्यामुळे तक्रारीसाठी विषाची बाटली घेऊन थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत ते पोहोचले आहेत. टोकावर पोहोचलेल्या कुटुंबाची व्यथा लक्षात तरी घेणार कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पोलिस अधीक्षक कार्यालयात आतापर्यंत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ढालगाव येथील दिलीप लिमकर हे जनावरांचे डॉक्‍टर आहेत. दोन वर्षांपूर्वीपर्यंत करगणी येथे कार्यरत होते. ढालगावला वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढल्याचे समजताच ते पत्नी, मुलासह गावाकडे परतले. ढालगावात पूर्वी असताना आणि आता परतल्यानंतरही त्यांची परवड सुरू झाली आहे. सख्खा भाऊ, भावाची पत्नी, मुलगा आणि इतरांकडून त्रास दिला जात आहे. दिलीप यांची पत्नी स्नेहल टेलरिंगचा व्यवसाय करते. परंतु दुकानात जाऊन त्रास दिला जातो. मारहाण केली जाते. दीर आणि कुटुंबाविरुद्ध डिसेंबर 2016 मध्ये तक्रार दिली. त्यानंतरही त्रास सुरूच आहे. विहिरीत रसायन टाकून पाणी दूषित केले. ढालगाव आऊट पोस्टला जाऊन तक्रार केल्यानंतर सध्या लाचखोरीत अटकेत असलेल्या सहायक फौजदार किल्लेदार व मगदूम यांनी धुडकावून लावले. 

दिलीप बाहेरगावी गेल्यानंतर दारू पिऊन त्यांच्या घरात जाणे. कोंबड्या चोरून खाणे. कुत्री, मांजराला औषध घालून मारणे. घरावर दगड मारणे असेह प्रकार सुरूच आहेत. त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना मारहाण झाल्यामुळे दोघेजण त्यांच्याकडेच राहतात. पोलिस ठाण्यात दाखल असलेली केस मागे घे नाहीतर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली जाते. पोलिस कर्मचारी किल्लेदार व मगदूम यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ते शिवीगाळ करतात अशी कुटुंबाची तक्रार आहे. ज्यांच्याविरुद्ध तक्रार आहे त्यांनाच पाठीशी घालण्याचे काम या दोघा पोलिसांनी केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर दोघा पोलिसांनी दिलीप व स्नेहल यांना खोटे पाडले. उलट त्यांच्यावरच खोट्या केसेस दाखल केल्या. लिमकर यांनी पोलिस अधीक्षकांकडे आतापयर्यंत सातवेळा तक्रार केली. अधीक्षकांनी कवठेमहांकाळ पोलिसांना तक्रारीनंतर कारवाई करण्याचे आदेश देऊनही पोलिसांनी दखल घेतली नाही. 

दुकानाची तोडफोड
स्नेहल लिमकर यांच्या दुकानाची काल (ता. 21) तोडफोड केली. त्यांना मारहाण केली. दिलीप तत्काळ घटनास्थळी धावले. नंतर दोघांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. परंतु ती घेतली नाही. त्यामुळे कुटुंबाने थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. न्याय मिळाला नाहीतर विष पिणार म्हणून बाटली काढली. पोलिसांनी ती काढून घेऊन तक्रार अर्जावर पोहोच दिली. परंतु आजही दुपारपर्यंत पंचनामा झाला नव्हता. 

कारवाई केली जाईल
पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,""पोलिस ठाण्याचा पदभार नुकताच स्वीकारला आहे. लिमकर यांनी काल अधीक्षक कार्यालयात तक्रार केल्यानंतर अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लिमकर यांच्या तक्रारीची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल.''

Web Title: sangli news limkar family police