मदनभाऊंच्या समाधीवरही कारभाऱ्यांचा डल्ला ?

जयसिंग कुंभार
गुरुवार, 12 एप्रिल 2018

काँग्रेस नेते मदन पाटील यांच्या निधनानंतर समाधिस्थळ विकास व पूर्णाकृती पुतळा विकासाचा निर्णय सर्वपक्षीय संमतीने पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केला आणि तो तडीस नेला. नेत्यांचे स्मारक म्हणून निदान इथे तरी गैरव्यवहाराला थारा मिळणार नाही अशी अपेक्षा होती; मात्र ती फोलच ठरली. कृष्णाकाठी वसंतदादा स्मारक परिसरातच समाधिस्थळासाठी १ कोटी ९१ हजार १४३ रुपये खर्च झाला आहे. मदन पाटील यांच्या पुतळ्याच्या ‘दिसण्यावरून’ सुरू झालेल्या वादानंतर कृष्णाकाठावरील समाधिस्थळासाठी झालेला हा प्रचंड खर्च पाहून नेमके त्यातून केलंय तरी काय याचा कानोसा या खर्चाचे बिंग फोडणारा ठरला. ‘सकाळ’च्या टीमने बांधकाम क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यरत कंत्राटदार, इंजिनिअर्स, शिल्पकार, इलेक्ट्रिक कंत्राटदार यांच्यासोबत प्रत्यक्ष समाधिस्थळी जाऊन झालेल्या कामाचे त्रयस्थपणे परीक्षण केले. त्यातून पुढे आलेले निष्कर्ष... 

कारागिरीचे काम व प्रतिमा

  •  स्टोन इंचिंग (मार्बलमध्ये संगणकीय तंत्राद्वारे सॅडो प्रतिमा) या कामासाठी दाखवलेला खर्च १ लाख ५० हजार इतका आहे. बाजारात ही प्रतिमा पाच ते वीस हजारांपर्यंत मिळते. 
  •  फायबरमध्ये बनवलेले उचित चित्र - फायबरमध्ये बनवलेली या चित्रकृतीसाठी २ लाख रुपयांचा खर्च दाखवला आहे. बाजारात यासाठी २० ते ५० हजार रुपयांचे दर सांगण्यात आले. 
  •  म्युरल ऑन वॉल (फिनिक्‍स पक्ष्यांची प्रतिमा) - या कामासाठी ८.९७ लाख रुपये इतका प्रचंड खर्च  दाखवला आहे. मेटलमधील हे म्युरल बनवण्यासाठी ४० हजार ते १ लाख रुपये इतका खर्च सांगण्यात आला. 
  •  अशा कलाकृती बनवणारे कारागीर आहेत. त्यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली. सांगलीतील काही शिल्पकारांकडे या कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशी केली असता त्यांनी हे काम कारागिरी स्वरूपाचे असल्याने त्यांची किंमत करता येऊ शकते, असे सांगण्यात आले. 

लॉन, स्प्रिंकलर व इलेक्ट्रिफिकेशन 
समाधी परिसरात हिरवळीचे (लॉन) साठी अडीच लाख रुपये खर्च दाखवला आहे. रेडिमेड स्वरूपात लॉन सेटिंगचा दर पंधरा रुपये प्रति चौरस फूट इतका आहे. इथे सुमारे दोन हजार चौरस फुटात काम झाले आहे. त्याचा बाजाराभव जास्तीत जास्त तीस हजार रुपये इतका होऊ शकतो. 

स्प्रिंकलर (लॉन भिजवण्यासाठी कारंजे) 
या नोंदीखाली २ लाख ५७ हजार ९४४ रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. बाजारभावाप्रमाणे सध्या एक एकर क्षेत्रावर स्प्रिंकलरची सोय करण्यासाठी  चाळीस हजार रुपये खर्च येतो. साहजिकच अडीच गुंठे लॉनसाठी दाखवलेला हा खर्च किती अनाठायी आहे हे लक्षात येते. 

इलेक्‍ट्रीफिकेशन 
समाधिस्थळी एलईडी लाईटची सोय आहे. बांधकाम खर्चाच्या ५ ते ७ टक्के इतका खर्च गृहीत धरला जातो. इथे २५ टक्के इतकी रक्कम खर्च दाखवली आहे. अर्थात यातून नेमका कोणता खर्च झाला याचा तपशील मात्र समजत नाही.  

या तीन नोंदीसाठी झालेला एकूण खर्चच अवास्तव आहे. या काळात स्टीलसाठीचा कोट केलेला दर ५४ हजार प्रतिटन इतका दर लावण्यात आला आहे. बांधकाम काळातील बाजारभाव ३६ ते ४० हजार रुपये प्रतिटन होता. यासाठी वापरलेले ग्रेनाईट साडेचारशे रुपये प्रति चौरस फुटांचा खर्च नमूद केला आहे. बाजारातील त्या दर्जाचे ग्रेनाईट आणि फिटिंग दरास २५० रुपये इतका आहे. त्यामुळे झालेला हा खर्च अवास्तव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

या ठिकाणी जुन्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी दाखवलेला सुमारे नऊ लाख रुपयांचा खर्च नेमका कशासाठी झाला याचा उलगडा होत नाही. कारण समाधी होण्यापूर्वी इथे जुने कोणतेही बांधकामच अस्तित्वात नव्हते. होता तो अंत्यसंस्कारासाठी वापरलेला कठडा.

 

Web Title: Sangli News Madan Patil Samadhi Issue