महाडिक बंधूंची विधानसभेसाठी तयारी

महाडिक बंधूंची विधानसभेसाठी तयारी

इस्लामपूर - आजपर्यंत अनेक राजकीय नेत्यांना तलवार भेट देऊन वाळवा, शिराळा तालुक्‍यात पाठिंबा दर्शविणाऱ्या महाडिक कुटुंबातील राहुल महाडिक व  सम्राट महाडिक या दोन बंधूंनी इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात विधानसभेची तयारी सुरू केली आहे.

या दोन बंधूंनी भेट देण्याची तलवार लढण्यासाठी  उगारल्याने इस्लामपूर व शिराळा मतदारसंघातील ‘राष्ट्रवादी’ला गुदगुल्या, तर इतर विरोधकांची गोची झाली आहे. निवडणुकीपूर्वी वर्षभर महाडिक कुटुंबीयांनी जोर बैठका काढायला सुरवात केल्याने महाडिकांची मेहनत फळाला येणार का? याबाबत उत्सुकता आहे. 

सांगली, कोल्हापूर व सोलापूर या तीन जिल्ह्यांतील राजकारणात महाडिक कुटुंबीयांचा दबदबा आहे.  महाडिक कुटुंबात एक खासदार, एक आमदार, एक जिल्हा परिषद अध्यक्ष, एक माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक अशा अनेक पदांवर या कुटुंबातील सदस्य सध्या काम करीत आहेत. यात महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, मीनाक्षीताई महाडिक हे आघाडीवर आहेत. वनश्री नानासाहेब महाडिक हे सांगली जिल्ह्यातील राजकारण पाहतात.

आजवर त्यांनी वाळवा, शिराळा तालुक्‍यासह जिल्ह्यातील अनेक राजकीय कुटुंबांना ऐनवेळी मदतीचा हात दिला आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनीही पेठ नाका येथील महाडिक कुटुंबीयांना कामापुरते वापरून लाभाच्या वेळी बाजूला केले आहे, हा भळभळता इतिहास आहे. वाळवा,  शिराळा तालुक्‍यात महाडिक कुटुंबीयांनी मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, जयंत पाटील व इतर सर्व विरोधकांना आळीपाळीने आपली राजकीय ताकद दिली आहे.

प्रत्येक निवडणुकीत महाडिक गटाची निर्णायक ताकद या सर्वांना मिळाली आहे. निवडणूक झाल्यावर व निवडून आल्यावर संबंधित उमेदवाराला आपण आपल्या ताकदीवर निवडून आल्याचा भास होतो व महाडिक कुटुंबीयांचा हळूहळू विसर पडतो. हे महाडिकांच्याही अंगवळणी पडले आहे. मात्र, पंचायत समिती सदस्य  राहुल महाडिक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांनी या वेळेला जुनी पायवाट बंद करून  स्वतःची वाट निर्माण करण्याचा मनसुबा आखला आहे. 

राहुल महाडिक यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात गावोगाव नियोजनबद्ध दौरा आखून आपले काम सुरू केले आहे; तर सम्राट महाडिक यांनी यावेळेला शिराळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी अगदी नियोजनबद्ध हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातूनच त्यांनी गावोगाव महाडिक युवा शक्तीची शाखा, गाव तेथे सक्षम कार्यकर्ता हे धोरण अवलंबले आहे. या अनुषंगाने रविवारी महाडिक युवा शक्तीतर्फे शिराळा येथे नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

राजकीय समीकरणे बदलणार 
महाडिक बंधूंच्या निवडणूक लढवण्याच्या या पवित्र्याने वाळवा, शिराळा तालुक्‍यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. महाडिकांच्या या भूमिकेने राष्ट्रवादी म्हणजेच शिराळ्यात मानसिंगराव नाईक गट व इस्लामपुरात जयंत पाटील गट यांच्यात खुशीचे वातावरण आहे. तर दोन्ही तालुक्‍यातील भाजपला महाडिकांची भूमिका अडचणीची ठरेल. महाडिकांची ही भूमिका स्वतःचे मायलेज वाढवण्यासाठी असेल की महाडिकांच्या जीवावर सुसाट सुटणाऱ्या इतरांना गतिरोधक होईल हे येणारा काळच ठरवेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com