भोंदू कुंभार महाराजाचा कडेगावजवळ भांडाफोड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

कुंभार महाराजाचा पर्दाफाश करण्यासाठी आज अं.नि.स. कार्यकर्त्यांनी कडेगाव पोलिसांची मदत मागितली. त्यानुसार आज दुपारी कार्यकर्ते व साध्या वेशातील पोलीस थेट कुंभार महाराजाच्या दरबारात दाखल झाले. सदर महाराज दर गुरूवारी व पौर्णिमेला दरबार भरवत असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली होती.

कडेगाव : थेट देवाशी संवाद करून, दैवी सामर्थ्याने अनेक समस्या सोडविणारा भोंदू कुंभार महाराज व त्याचे दोन साथीदार यांना कडेगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर ' जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत' कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे.

याबाबत माहिती अशी की, कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील रहिवाशी तानाजी महादेव कुंभार (वय ६०) उर्फ कुंभार महाराज हा गेली अनेक महिन्यांपासून बुवाबाजी करून लोकांची फसवणूक करत असल्याची तक्रार अं. नि.स. कडे आली होती. 

कुंभार महाराजाचा पर्दाफाश करण्यासाठी आज अं.नि.स. कार्यकर्त्यांनी कडेगाव पोलिसांची मदत मागितली. त्यानुसार आज दुपारी कार्यकर्ते व साध्या वेशातील पोलीस थेट कुंभार महाराजाच्या दरबारात दाखल झाले. सदर महाराज दर गुरूवारी व पौर्णिमेला दरबार भरवत असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली होती.

दत्तमंदिरात पूजा झाल्यावर दरबार सुरू करून महाराजाने भक्तांची गा-हाणे ऎकण्यास सुरूवात केली. समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला रू. शंभर फक्त नोंदणी फी जमा करून रांगेत बसावे लागते. त्यानुसार भगवान रणदिवे व प्रशांत पोतदार समस्या घेऊन पैसे भरून रांगेत बसले. त्यांचा नंबर आल्यावर महाराजांनी बोलवून घेतले. रणदिवे यांनी घरात शांतता नाही, भांडणे व वाद होतात अशी तक्रार केली. महाराजांनी देवाशी अतींद्रिय शक्तिद्वारे संवाद साधण्याचे नाटक केले. वहीमध्ये विचित्र लिखाण करून माझे देवाशी बोलणे झाले, तुझी समस्या सुटेल, माझ्या दैवी सामर्थ्याने सर्व समस्या सुटतात असे सांगितले. नारळ, सुपारी, घेऊन ते पांढऱ्या कपड्यात बांधून जोतिबा मंदिरात जाऊन त्यावर गुलाल टाका आणि ते घराच्या आड्याला बांधण्याचा सल्ला दिला. तसेच मंतरलेला अंगारा दिला. हा सगळा प्रकार चालू असताना साध्या वेशातील पोलिसांनी भोंदूची पद्धत पाहिली.भोंदूचा हा सर्व प्रकार कॅमेरात चित्रित करण्यात आला आहे. 

कुंभार महाराजाचे स्ट्रिंग आॅपरेशन केल्यावर पोलिस स्टेशनचे अधिकारी दाखल होवून बुवाबाजीचे साहीत्य, मंतरलेल्या पुड्या, गंडेदोरे, रोख रक्कम, नोंद वही व महाराजाचे लिखाण ताब्यात घेतले.

या बुवाबाजीचा पर्दाफाश मध्ये कुंभार महाराज, त्याचे साथीदार सोपान निवृत्ती महाडीक (रा. नेवरी), नवनाथ यमगर (रा. नेवरी) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश २०१३ कायद्यानुसार कलम ३(२), अनुसूची २(५) नुसार कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव प्रशांत पोतदार, राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सचिव भगवान रणदिवे, सांगली जिल्हा कार्याध्याक्ष अजय भालकर, अवधूत कांबळे, विजय नांगरे व इंद्रायणी पाटील यांनी या मोहिमेत भाग घेतला.

पोलिस उपाधिक्षक अमरसिंह निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पी. एस. आय शिरतोडे, पोलिस हवलदार एस. पी. बांगर, एम. डी. जाधव, ए. एल. आंबेकर, एम. एस. महाडीक, व्ही. डी. वुंडे यांनी कारवाई केली.

Web Title: Sangli news maharaj arrested in Kadegaon