म्हैसाळ योजनेतून आजपासून पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

मिरज - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचं घोडं अखेर आज कृष्णेत न्हालं. दुपारी पंधरा कोटी रुपयांचा निधी पाटबंधारे विभागाकडे जमा झाला आणि तो तत्काळ महावितरणकडे वर्ग करण्यात आला. सायंकाळी उशिरा योजनेचा वीजपुरवठा जोडण्यात आला. तांत्रिक तपासणी पूर्ण झाली. आज (ता. २४) सकाळी पंप सुरू करून कालव्यातून पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.

मिरज - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचं घोडं अखेर आज कृष्णेत न्हालं. दुपारी पंधरा कोटी रुपयांचा निधी पाटबंधारे विभागाकडे जमा झाला आणि तो तत्काळ महावितरणकडे वर्ग करण्यात आला. सायंकाळी उशिरा योजनेचा वीजपुरवठा जोडण्यात आला. तांत्रिक तपासणी पूर्ण झाली. आज (ता. २४) सकाळी पंप सुरू करून कालव्यातून पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल. अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी येथे ही प्रक्रिया पार पाडली. म्हैसाळच्या लाभक्षेत्रात मात्र शेतकऱ्यांना सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे. खासदार संजय पाटील यांनी पुढाकार घेऊन हा विषय मार्गी लावला.

टेंभू, ताकारी योजनेबाबत प्रतीक्षा
कृष्णा खोरे महामंडळाने राखीव निधीतून निधी मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित १५ कोटी रुपयांचे काय, ते ताकारी व टेंभूसाठी कधीपर्यंत मिळतील, हे प्रश्‍न तूर्त अनुत्तरित आहेत. 
‘म्हैसाळ’ ला निधी मिळाल्याने दोन महिन्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी रान उठवले होते.

मुंबईत खासदार संजय पाटील ताकदीने पाठपुरावा करत होते. आमदार सुरेश खाडे यांनीही दोन दिवसांपूर्वी त्यात उडी घेत राजीनामा देण्याची भाषा केली होती. आज पंधरा कोटींच्या प्रस्तावावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वाक्षरी केली. तसे पत्र पुण्यात कृष्णा खोरे महामंडळाचे मुख्य अभियंता श्री. घोटी यांना दुपारी मिळाले. हे पैसे विजेच्या थकबाकीपोटी महावितरणकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर वीजपुरवठा देण्यात आला. 

आंदोलन स्थगित
निधी मिळाल्याने मागणी पूर्ण झाली आहे; त्यामुळे शनिवारपासूनची सलगरे ते मिरज पाणी संघर्ष यात्रा  स्थगित केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे यांनी दिली. 

आर्थिक स्थिती एका नजरेत (आकडे रुपयांत)

  • योजनेची वीजबिल थकबाकी ः ३५ कोटी 
  • टेंभू, ताकारीची थकबाकी ः १० कोटींवर
  • कृष्णा खोरेतून निधीची घोषणा ः ३० कोटी
  • आज मिळाले ः १५ कोटी

सुरेश खाडेंवर टीका
आमदार सुरेश खाडे यांनी तीस कोटी मिळाल्याचे कालच जाहीर केले होते. प्रत्यक्ष आज पंधरा कोटी रुपये  मिळाले. दुपारी सही झाली. त्यामुळे खाडे कमी  माहितीवर आधारित बोलतात, त्यांचे अज्ञान उघडे पडले, अशी टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे, खंडेराव जगताप, सलगरेचे सरपंच तानाजी पाटील, सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, वसंतराव गायकवाड यांनी केली.

फाईलचा प्रवास 
ताकारी, म्हैसाळ व टेंभू योजनांच्या वीजबिलांसाठी पन्नास कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव ऊर्जा मंत्रालयाने बनवला. आपत्ती निर्वारण व महसूलकडे टंचाईतून मदत मागितली. ती अर्थ मंत्रालयाकडे गेली. तेथे ‘मदतीशी संबंध नाही’, असे सांगून प्रस्ताव परत पाठवला. कृष्णा खोरे महामंडळाकडील दोनशे कोटी रुपयांच्या राखीव निधीतून तरतुदीचा निर्णय शासनाने घेतला. खासदार पाटील यांच्या पुढाकाराने नव्याने प्रस्ताव तयार केला. पन्नास कोटीस मुख्यमंत्री तयार होते, मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नकार दिला. ते तीस कोटींसाठी तयारी झाले; प्रत्यक्ष १५ कोटी आले. महाजन दिल्लीत असल्याने सकाळी विमानाने फाईल पाठवली. स्वाक्षरी होऊन विमानाने परत आणली. टेंभू व ताकारीसाठीचे पैसे आठवडाभरात मिळवू, असा विश्‍वास खासदार पाटील यांनी व्यक्त  केला. 
 

Web Title: Sangli News Mahishal scheme water issue