हरिदत्त माने, गायकवाड असिस्टंट कमांडंटपदी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

सांगली - केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दल असिस्टंट कमांडंट पदाच्या परीक्षेत सावर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) येथील हरिदत्त दादासाहेब माने यांनी देशात ११३ वा, तर तासगाव येथील सूरज शिवाजी गायकवाड यांनी १४७ वा क्रमांक पटकाविला. 

सांगली - केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दल असिस्टंट कमांडंट पदाच्या परीक्षेत सावर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) येथील हरिदत्त दादासाहेब माने यांनी देशात ११३ वा, तर तासगाव येथील सूरज शिवाजी गायकवाड यांनी १४७ वा क्रमांक पटकाविला. 

दोघे कोल्हापुरातील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरचे माजी विद्यार्थी आहेत. हरिदत्त यांनी गावातील भवानीदेवी इंग्लिश स्कूलमधून दहावीला ९० टक्के गुण मिळवले. राजाराम महाविद्यालय व विद्यानिकेतन येथून अकरावी-बारावीचे शिक्षण घेतले. पुण्यातील कृषी महाविद्यालयातून बी. एस्सी. ॲग्रिकल्चरमध्ये ८५ टक्के गुण मिळविल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

आई शशिकला, भाऊ विराज व काका-काकी यांनी घरची जबाबदारी सांभाळत त्यांना प्रोत्साहित केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात त्यांनी अभ्यासास सुरवात केली. दहा तास अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. मात्र, खचून न जाता सातत्यपूर्ण अभ्यास केला. 
सूरज सैनिक स्कूल तासगावमधून दहावीला ९०, तर बारावी विज्ञान शाखेत ७८ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

नांदेडमधील गुरू गोविंदसिंग इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी बी. टेक. प्रॉडक्‍शन इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. कॉलेजमधील यूपीएससी चॅप्टर स्टडी ग्रुपमधून त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासास सुरवात केली. दिल्लीतील खासगी क्‍लासमध्ये वर्षभरासाठी त्यांनी प्रवेश घेतला होता. दिवसांतील चौदा तास ते अभ्यास करत होते. ते पहिल्याच प्रयत्नात असिस्टंट कमांडंट पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांची आई हेमलता मणेराजुरीतील प्राथमिक विद्यालयात शिक्षिका व वडील शिवाजी तासगावमधील नेहरूनगर हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. त्यांचा भाऊ पंकज एम. बी. बी. एस.चे शिक्षण घेत आहे. 

सातत्यपूर्ण अभ्यास यशाचे गमक आहे. पहिल्या प्रयत्नात मी यशस्वी झालो नाही. ते अपयश मी यशाची पहिली पायरी मानले. प्रयत्न करत राहिलो, तर ‘नथिंग इज इम्पॉसिबल’ हे सूत्र मनाशी बाळगले होते. त्याचा परिपाक म्हणजे हे यश आहे. 

- हरिदत्त माने.

Web Title: Sangli News Mane Gaiyakwad as assistant commandant