बेडगमध्ये चाके थंडावली; मरगाई यात्रेतील शेकडो वर्षांची परंपरा

संतोष भिसे
सोमवार, 19 मार्च 2018

आरग - बेडगमध्ये मरगाई देवीची यात्रा तोंडावर आली अन्‌ गावातील चाके थंडावली. वर्षभराच्या कामाच्या धबडग्यानंतर त्यांना आठवडाभराची हक्काची विश्रांती मिळाली. यात्रेपुर्वी आठवडाभर चाकांना विश्रांती देण्याची परंपरा बेडगमधील गावकरी शेकडो वर्षांपासून पाळत आले आहेत.

आरग - बेडगमध्ये मरगाई देवीची यात्रा तोंडावर आली अन्‌ गावातील चाके थंडावली. वर्षभराच्या कामाच्या धबडग्यानंतर त्यांना आठवडाभराची हक्काची विश्रांती मिळाली. यात्रेपुर्वी आठवडाभर चाकांना विश्रांती देण्याची परंपरा बेडगमधील गावकरी शेकडो वर्षांपासून पाळत आले आहेत.

यंदाही कालच्या पाडव्याला गावातील सर्व गिरण्या, डंक, तेलघाणे बंद झाले. येत्या गुरुवारी ( ता. 22 ) यात्रेचा पहिला दिवस असून त्यादिवशी चाके पुन्हा सुरु होतील. 

बेडगमध्ये चैत्रात मरगाई देवीची यात्रा भरते. यंदा 22 ते 25 मार्चदरम्यान भरगच्च कार्यक्रमांसह आयोजन केले आहे. मोठ्या संख्येने ग्रामस्थ नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने देशभर स्थायिक झाले आहेत; ते यात्रेला गर्दी करतात. मरगाई देवस्थानाला धार्मिक अधिष्ठान तर आहेच; शिवाय काही जगावेगळ्या परंपराही शेकडो वर्षांपासून श्रद्धापुर्वक जपल्या आहेत. पाडव्यापासून यात्रेच्या प्राथमिक विधींना प्रारंभ होतो. यादिवशी गावातील सर्व चाके थंडावतात. काही वर्षांपुर्वीपर्यंत चाकांवर आधारीत सर्व व्यवसायांना विश्रांती दिली जायची.

यामध्ये मोटेने पाणी खेचणे, लोहार-सुतारांसह बारा बलुतेदारांचे चाकाशी संबंधित व्यवसाय सारे काही आठवडाभरासाठी बंद रहायचे. त्यांची गती रोखली जायची. यात्रेच्या पहिल्या दिवसापर्यंत विश्रांती असायची. देवीला नैवेद्य दाखवला कि पुन्हा त्यांना गती मिळायची. ही अनोखी परंपरा का व कशी सुरु झाली याचे नेमके उत्तर कोणाकडेही नाही; मात्र परंपरा पाळली जातेय हे मात्र खरे. बदलत्या काळात निर्बंधांवर मर्यादा आली. फक्त पिठाच्या गिरण्या, चटणीचे डंक, तेलघाणे यांच्यापुरतेच ते राहीले. आजही बेडगचे ग्रामस्थ यात्रेचे सर्व दळप-कांडप पाडव्यापुर्वी गिरण्या सुरु असेपर्यंत आटोपून घेतात. यात्रेची बेगमी करुन ठेवतात. 

त्राटीकेच्या सोंगाची वैशिष्ट्यपूर्ण मिरवणूक

यात्रेत निघणारी त्राटीकेच्या सोंगाची मिरवणुक हीदेखील वैशिष्ठ्यपुर्णच. आंबिल शिंपणाचा विधी संपल्यानंतर त्राटीकेच्या सोंगाची मिरवणुक निघते. चित्ताकर्षक रंगभुषा आणि वेशभुषा केलेले सोंग मिरवणुकीत जिवंतपणा आणते. परशराम लक्ष्मण नागरगोजे यांच्यासह संपुर्ण नागरगोजे कुटुंबिय सोंगासाठी महिन्याभरापासून झटत असते. रावणाची बहीण शुर्पणखेचे हे रुप भव्य, अक्राळविक्राळ आणि अगडबंब असते. सुमारे एक किलोमीटरच्या अंतरात ते पेलत नेणे म्हणजे कसरत ठरते; कलाकार ते निभावून नेतात. सैनिक, घोडे यांच्या सोबतीने निघालेली मिरवणुक पाहण्यासाठी पंचक्रोशीतून भाविक गर्दी करतात.

रामायणात लक्ष्मणाने शुर्पणखेचे नाक कापल्यानंतर तिने भाऊ रावणाकडे जाऊन केलेला थयथयाट या सोंगातून दर्शवला जातो. सोबतीला सशस्त्र सैनिक, खेळाडू, घोडेस्वार, सैनिक असतात. रात्रीच्या अंधारात निघालेली मिरवणुक मध्यरात्री रगाई मंदिराजवळ जाऊन विसर्जित होते.

यंदा शुक्रवारी ( ता. 23 ) रात्री मिरवणुक निघेल. यासाठी परशराम नागरगोजे यांच्यासह महादेव नागरगोजे, अरुण सुतार, लक्ष्मण नागरगोजे, अर्जुन नागरगोजे, शंकर सुतार, रवींद्र नागरगोजे, महेश सुतार, शिवाजी नागरगोजे, प्रकाश नागरगोजे, रमेश इचलकरंजे, सिद्धु नागरगोजे, धोंडीराम सूर्यवंशी, राजाराम केंगार, दगडू जाधव, परशराम केंगार, चंद्रकांत होवाळे आदी मंडळी परिश्रम घेतात. सध्या सोंगाची तयारी व सरावाला सुरुवात झाली आहे.

डिजीटलवर बंदी, शर्यतींना फाटा
यात्रा समितीने यंदा यात्रेत डिजीटल लावण्यावर पुर्णतः मनाई आणली आहे. दरवर्षी यात्रा कालावधीत गावभर डिजीटल भरलेली असतात. गावाचे रुपडेच बिघडून जाते. क्वचितप्रसंगी डिजीटलवरुन हाणामाऱ्या होतात. हे लक्षात घेऊन यंदा डिजीटलवर बंदी आणली आहे; शिवाय कोणत्याही शर्यती होणार नसल्याचे समितीने सांगितले.

Web Title: Sangli News Margai Yatra Special Story