लग्नाच्या दिवशी वधू "रोहयो' कामावर... 

लग्नाच्या दिवशी वधू "रोहयो' कामावर... 

सांगली - लग्नाच्या दिवशीच चक्क वधू रोजगार हमी योजनेच्या कामावर हजर दाखवण्याचा प्रताप ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे केला आहे. दोन मृतांनीदेखील जिवंत होऊन "रोहयो' मध्ये काम केल्याचे रेकॉर्ड तयार झाले. अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शिक्षक, बॅंक कर्मचाऱ्याची देखील हजेरी दाखवून एक कोटी 30 लाखांचा घोटाळा केल्याची माहिती गणेश शिंदे, ग्राम रोजगार सेवक मनोज लोटेसह ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ब्रह्मनाळ येथे रोजगार हमी योजनेत जवळपास एक कोटी 30 लाखांच्या कामात घोटाळा झाला आहे. 41 लाखांच्या मुरुमाची गौण खनिजाची पावतीच नाही. सुखवाडी ते ब्रह्मनाळ आणि वखार भाग येथे एकच रस्ता दोनवेळा केला आहे. इतर 21 रस्ते कामात देखील असेच घोटाळे झाले आहेत. रस्त्यांची गुणनियंत्रक पाहणीच झाली नाही. कमी मुरूम टाकून निकृष्ट कामे केली आहेत. अनेकांची मस्टरवर बोगस हजेरी नोंदवली आहे. बनावट जॉब कार्ड बनवलेत. छायाचित्र एकाचे व नाव एकाचे असे काही जॉब कार्ड आहेत. ब्रह्मनाळमधील निधी वापरून धनगाव, भिलवडी, खंडोबाचीवाडी, वसगडे येथे कामे दाखवून रक्कम उचलली गेली आहे. संबंधित गावांकडून कामाच्या मागणीचा अर्ज कोठेच दिसत नाही. 

प्रत्येक रस्त्यासाठी समाज निधी खर्च दाखवला आहे. 18 लाख रुपये मजूर व 6 लाख रुपये कामासाठी दाखवले आहेत. पंचायत समितीतील अधिकारी, कंत्राटदार, ग्रामसेवक, नेते यांच्या संगनमताने घोटाळा झाला आहे. प्रत्येक मस्टरला 10 ते 20 टक्केपर्यंत वाटा दिला आहे. ग्राम रोजगार सेवकांनी जिल्हा बॅंकेच्या पेठभाग, वसगडे शाखेतून रक्कम काढून कंत्राटदाराच्या खात्यावर भरली आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी काही दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसीलदार, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रार केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. प्रांताधिकाऱ्यांकडेही सुनावणी सुरू आहे. लोकायुक्तांकडेही चौकशीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून गुन्हे दाखल करावेत. अन्यथा ग्रामस्थ उपोषण करतील, प्रसंगी जनहित याचिका दाखल करणार आहे, असे श्री. शिंदे, लोटे यांनी सांगितले. अभयकुमार कांबळे, नंदकुमार लोटे, बोधिसत्व माने, राजेश तिरमारे, झाकीर सय्यद उपस्थित होते. 

असाही गडबड घोटाळा- 
ब्रह्मनाळमध्ये मजेशीर गडबड घोटाळा झाला आहे. जयश्री रामचंद्र नायकवडी हिचा विवाह 20 मे 2016 ला आष्टा येथील मंगल कार्यालयात झाला. परंतु 15 मे, 28 मे पर्यंत तिची "रोहयो' कामावर हजेरी लावली. इंदुमती राजगोंडा कर्नाळे, कल्लाप्पा बाळाप्पा शिरनाळे हे दोघे मृत झाल्यानंतरही कामावर आले आहेत. अंगणवाडी सेविका विमल गावडे यांची हजेरी नोंदवली आहे. गौरी शिंदे ही विवाहिता सासरी गेल्यानंतर तिचीही नोंद केली. इतरही गडबड घोटाळा केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com