धर्म समीक्षेशिवाय माणसाचा शोध अपूर्ण - डॉ. रावसाहेब कसबे

धर्म समीक्षेशिवाय माणसाचा शोध अपूर्ण -  डॉ. रावसाहेब कसबे

सांगली -  धर्म हा माणसाला आभासी सुख देतो. त्याच्या समीक्षेशिवाय माणसाचा शोध पूर्ण होणार नाही. धर्माची चिकित्सा करून मार्क्‍स आणि आंबेडकर यांनी माणूस हा केंद्रस्थानी आणला. बुद्ध आणि तुकाराम यांच्याही विचारात साम्य आहे. खरे तर संत नामदेवांनी नव्या विचाराचा पाया घातला आणि संतांनी माणसाला केंद्रस्थांनी आणले. त्यामुळे सर्व संतांना ब्राह्मणीकरणातून बाहेर काढले तरच लोकांचे कल्याण होईल, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी येथे केले.

शांतिनिकेतन लोकविद्यापीठात विचार जागर मंच व प्राचार्य डॉ. पी. बी पाटील सोशल फोरम यांच्यावतीने मार्क्‍स, गांधी, आंबेडकर पहिले विचारमंथन पार पडले. या मंथनाचे उद्‌घाटन डॉ. रावसाहेब कसबे यांच्या बीजभाषणाने झाले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे, साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशी, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो, डॉ. शशिकला राय, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, शांतिनिकेतनचे संचालक गौतम पाटील उपस्थित होते.

बीज भाषणात रावसाहेब कसबे म्हणाले, ‘‘कार्ल मार्क्‍स, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिघांनीही माणसांचे जीवन अर्थपूर्ण झाले पाहिजे, असे स्वप्न पाहिले होते. मात्र जग आज अराजकाच्या उंबरठ्यावर आहे. माणूस संकटात आहे. या वास्तवाचा विचार करून या महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा जागर विचार मंचाच्या माध्यमातून करत आहोत. कार्ल मार्क्‍स यांनी केलेली धर्म चिकित्सा त्याच्या विरोधकांनी विकृत स्वरूपात मांडली. मार्क्‍स धर्मविरोधी होता असे सांगितले गेले. पण तो धर्मविरोधी नव्हता तर धर्माच्या चिकित्सेतून माणसाचा शोध घेत होता.

लोकांचा सर्वाधिक छळ धर्माच्या नावाखालीच झाला. धर्म ही लोकांची अफू आहे असे मार्क्‍स म्हणाला ते वास्तव आहे. कारण ती अफू कुणी बाहेरून दिली नाही. जे धर्म मार्तंड आहेत त्यांनीच ती दिली. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे रामरहिमने धर्माच्या नावावर केलेले शोषण सर्वांपुढे आले आहे. सगळ्या धर्माचे मूलतत्त्व माणूस आला कोठून आणि जाणार कुठे? हेच आहे. धर्म माणसाला आभासी सुख देतो, असे प्रतिपादन सर्वप्रथम मार्क्‍सने केले.’’

ते म्हणाले,‘‘सर्व धर्म आणि देवांचा उगम हा मृत्यूच्या भीतीमध्ये आहे. जगण्याच्या संघर्षात माणूस थकला  तेव्हा त्याने ईश्‍वराची संकल्पना निर्माण केली. मात्र त्यालाच आपण शरण जातो याला मार्क्‍सने परात्म म्हटले आहे. खरेतर आपल्या संतांनी हे पूर्वीच लिहून ठेवले आहे. बुद्ध, कबीर, तुकाराम यांनी हेच सांगितले आहे. भक्तीच्या चळवळीचा पाया देशात सातव्या शतकात तमिळनाडूत घातला गेला. शूद्रातिशूद्र स्त्रियांनी ती केली. परमेश्‍वराला प्रश्‍न विचारणारी ती चळवळ होती.  महाराष्ट्रात ती संत नामदेवांनी आणली. त्यामुळे ज्ञानेश्‍वरांनी नाही तर नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि तुका झालासे कळस असे म्हटले पाहिजे.’’

डॉ. सदानंद मोरे यांना उल्लेख करून ते म्हणाले,‘‘या ठिकाणी तुकारामांचे वारस उपस्थित आहेत. त्यांनाही  माझी विनंती आहे की, संतांना ब्राह्मणीकरणातून बाहेर काढल्याशिवाय आजच्या तरुण पिढीला त्यांचे नेतृत्व कळणार नाही, याचा विचार करावा.’’ 

कसबे म्हणाले,‘‘महात्मा गांधींवर सुरवातीला ख्रिस्त विचारांचा पगडा होता. भारतात आल्यानंतर त्यांनी सर्व समाजाला सामावून घेता येईल अशी विचारपद्धती आपल्यात आणली. ते स्वत:ला सनातनी हिंदू मानत अस्पृश्‍यता नाकारत पण चातुर्वर्ण्याचा स्वीकार करत  होते. पण गांधीजींचे अनेकांना नीट आकलनच झाले  नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धधर्माचे पुनरुज्जीवन करताना त्याला नवे रूप दिले. मात्र ती समजण्याची पात्रता नसल्यामुळे एक मोठी क्रांतिकारक घटना घडू शकली नाही याची खंत वाटते.’’ या सर्वांनी धर्म चिकित्सा केली म्हणूनच वंचितांना न्याय मिळाला. पण अजूनही लढाई संपलेली नाही.

यावेळी बोलताना श्रीपाद जोशी म्हणाले,‘‘आजच्या गळेकापू स्पर्धेत मार्क्‍स, गांधी, डॉ. आंबेडकर विचारांची गरज आहे. त्यांच्या विचारांचा प्रवाह पुढे नेण्यासाठी जनांचा प्रवाह व्यापक करण्याची गरज आहे. धर्माबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम देशात सुरू आहे.’’
विचारमंथनाचे स्वागताध्यक्ष गौतम पाटील यांनी या मंथनाची भूमिका विशद केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्या ‘वेड्यांची शर्यत’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कसबे यांच्या हस्ते झाले. सर्व प्रमुख वक्‍त्यांचा पुरोगामी चळवळीचे प्रणेते महात्मा फुले यांची आठवण म्हणून घोंगडी आणि पगडी घालून सत्कार करण्यात आला. 

आंबेडकरांवर उपनिषदांचाही प्रभाव
आंबेडकरांनी वेद, पुराणे यांची धर्म चिकित्सा केली तरी उपनिषदांचा त्यांच्यावर पगडा होता. उपनिषदांनीच बुद्ध धर्मांची पार्श्‍वभूमी तयार केली होती. बुद्धांनी त्या विचारांवर आपला कळस चढविला. आणि आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारताना जसाच्या तसा न घेता त्याला आधुनिक स्वरूप दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com