इस्लामपूर-पेठ रस्त्याच्या दुरुस्तीबाबत शुक्रवारी बैठक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

सांगली -  मृत्यूचा सापळा बनलेल्या इस्लामपूर-पेठ रस्त्याची तसेच जिल्ह्यातील खराब रस्त्यांची जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दखल घेतली आहे. या रस्त्यांवरील पॅचवर्कही जुजबी आणि निकृष्ट झाल्याची गंभीर दखल घेत त्यांनी शुक्रवारी (ता. २७) सर्व शासकीय, निमशासकीय ठेकेदारांची बैठक बोलावली आहे.

सांगली -  मृत्यूचा सापळा बनलेल्या इस्लामपूर-पेठ रस्त्याची तसेच जिल्ह्यातील खराब रस्त्यांची जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दखल घेतली आहे. या रस्त्यांवरील पॅचवर्कही जुजबी आणि निकृष्ट झाल्याची गंभीर दखल घेत त्यांनी शुक्रवारी (ता. २७) सर्व शासकीय, निमशासकीय ठेकेदारांची बैठक बोलावली आहे.

राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या इस्लामपूर-पेठ रस्त्याची निकृष्ट कामे झाल्याने खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली. त्याविरोधात स्वाभिमानी संघटनेने जनआंदोलन सुरू  केले. या रस्त्यावर खड्ड्यांमुळे सतत अपघात होताहेत. ऐन दिवाळीतही छोटे छोटे अपघात झाले. त्यांची नोंद झाली नसली तरी या घटना गंभीर आहेत. त्याविरोधात दिवाळीच्या पूर्वसंध्येला रस्त्यावर खड्ड्यात दिवे लावण्याचे आंदोलनही झाले. मिरजेतही महापालिकेच्या रस्त्यांवरील खड्ड्यात दिवे लावण्यात आले. ऐन दिवाळीत विश्रामबागला स्फूर्ती चौकातील रस्त्यांवरील खड्ड्यांत  दिवे लावून नागरिकांनी आंदोलन केले.

फरशीचा ट्रक पलटल्याने जाग
रस्त्यांबाबत असे आंदोलन सुरू असताना ऐन दिवाळी पाडव्याच्या मध्यरात्री मणेराजुरी-योगेवाडी मार्गावर एका वळणावर धुक्‍यामुळे रस्ता न दिसल्याने फरशी घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. त्यात दहा जणांना प्राणास मुकावे लागले. तर २२ जण जखमी झाले. या घटनेलाही बऱ्याच अंशी रस्त्याची निकृष्ट कामे कारणीभूत आहेत. त्यामुळे प्रशासनालाही जाग आली.

पीडब्ल्यूडी-ठेकेदार संगनमत
रस्ते तयार करताना सार्वजनिक बांधकाम आणि ठेकेदार यांनी संगनमताने शासनाच्या नियमाला हरताळ फासून खराब, नियमबाह्य रस्ते केलेत. त्यांची गुणवत्ता आणि दर्जा यांची कोणतीही पाहणी करण्याचे काम सार्वजनिक बांधकामकडून केले जात नाही. त्यामुळेच रस्त्यांवर दिशादर्शक फलक नाहीत, रस्ते दुभाजक व्यवस्थित नाहीत, स्पीडब्रेकरही नियमानुसार नाहीत. त्यामुळे रस्ते वाहतुकीपेक्षा अपघाताला निमंत्रण देणारेच ठरताहेत. 
काही दिवसांत स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांनी सातत्याने आवाज उठवून आंदोलन केले. नागरिकांचाही प्रतिसाद मिळाला. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.२७) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली आहे. सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांनाही निमंत्रित केले आहे.

सर्वांची झाडाझडती
दोन महिन्यात वाळूसाठ्यांवरील छापे, मातोश्री पेट्रोल पंपावरील छापा, फटाके साठ्यांवरील छापा, सेतू केंद्रांवरील छापे यांचा धडाका लक्षात घेता, रस्त्यांबाबतच्या बैठकीत आजवर टक्केवारीवर पोसलेले बांधकामचे अधिकारी आणि ठेकेदारांचीही झाडाझडती होण्याची चिन्हे आहेत.

महसूलसह पालकमंत्र्यांचेही दुर्लक्ष

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रस्त्याच्या प्रश्‍नांकडे फारसे गांभीर्याने पहायचेच नाही, असे ठरवले आहे. ऐन दिवाळीत  नागरिक रस्त्यांच्या निकृष्टतेबाबत, त्यांच्या धोकादायक स्थितीबाबत आंदोलन करीत असताना दोघे मंत्री दिवाळी करण्यात मश्‍गुल होते. आज तर सिक्कीमचे राज्यपालही याच रस्त्याने आले. त्यांनी रस्त्याबाबत काय विचार  केला तेच जाणोत. मात्र स्वत: जिल्हाधिकारी श्री. काळम-पाटील यांनीच रस्त्यांबाबत बैठक बोलवल्याने काही मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Sangli News meeting for road Repairing on friday