हिवतडमध्ये 300 एकरावर फुलले झेंडूचे मळे

नागेश गायकवाड
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

आटपाडी -  टेंभूच्या पाण्याचा तालुक्‍यात सर्वाधिक लाभ हिवतड (ता. आटपाडी) या गावाला झाला आहे. येथील शेतकऱ्यांनी कष्ट, चिकाटीच्या जोरावर शेतीत विक्रमी उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांनी चांगली आर्थिक प्रगतीही केली आहे. गेल्या वर्षीपासून हिवतड ‘झेंडू फुलांचे हब’ बनले आहे. अडीचशेवर शेतकऱ्यांनी तीनशे एकरांत झेंडूपासून तब्बल सहा-सात कोटींचे उत्पन्न मिळवले.

आटपाडी -  टेंभूच्या पाण्याचा तालुक्‍यात सर्वाधिक लाभ हिवतड (ता. आटपाडी) या गावाला झाला आहे. येथील शेतकऱ्यांनी कष्ट, चिकाटीच्या जोरावर शेतीत विक्रमी उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांनी चांगली आर्थिक प्रगतीही केली आहे. गेल्या वर्षीपासून हिवतड ‘झेंडू फुलांचे हब’ बनले आहे. अडीचशेवर शेतकऱ्यांनी तीनशे एकरांत झेंडूपासून तब्बल सहा-सात कोटींचे उत्पन्न मिळवले.

२०१३ मध्ये तालुक्‍यात पहिल्यांदा टेंभूचे पाणी आले. पुढे सांगोला तालुक्‍यात गेले. सांगोल्याला पाणी हिवतडमार्गे मुख्य कालव्यातून जाते. त्यामुळे हिवतडला पाण्याचा मोठा लाभ झाला. शेतकऱ्यांनी ढबू मिरची, टोमॅटो, डाळिंब, वांगी, झेंडूची फुलशेती असे प्रयोग केले. त्यांनी साऱ्याच पिकातून कमी-जास्त पैसे  मिळवले. त्यातही झेंडूपासून खात्रीशीर उत्पन्न मिळू लागल्यामुळे तीन वर्षांत झेंडूकडे बहुसंख्य शेतकरी वळले. गावात झेंडूची तीनशे एकरवर फुलशेती सुरू आहे. 

मे महिन्यात अडीचशे शेतकऱ्यांनी ऑरेगोल्ड आणि गोल्डस्पॉट झेंडूची तीनशे एकरवर चार लाख रोपांची  माती बेडवर ठिबकच्या सहाय्याने लागवड केली. त्यापूर्वी शेणखत आणि वरखते देऊन मल्चिंग केले. लावगडीनंतर शिफारशीप्रमाणे कीटकनाशक, बुरशीनाशकांच्या  फवारण्या घेतल्या. 

साठ दिवसांत फुले तोडायला आली. हिवतडचा झेंडू गावातून दररोज दोन आयशर भरून मुंबई बाजारपेठेत पाठवला जातो. तीन महिने फुले पाठवली जात आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सरासरी साठ रुपये प्रतिकिलो असा दर मिळत आहे. पंधरा रुपये वाहतूक खर्च वजा जाता ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो हाती पडतात.

एकरी खर्च पन्नास हजार आला. खर्च वजा जाता सरासरी दोन-अडीच लाख रुपये उत्पन्न मिळाले. स्थानिक कंपनी आणि काही शेतकरी एकत्र येऊन फुले व्यापाऱ्यांना पाठवतात. आत्तापर्यंत झेंडूपासून सहा ते सात कोटी गावात रुपये आलेत.

चार वर्षांतील प्रयोगानंतर झेंडू लागवडीत यश आले. दराची खात्री मिळाली. बहुसंख्य शेतकरी झेंडूकडे वळलेत. गावचा परिसर फुलांनी रंगीबेरंगी बनला आहे. गावात चांगले पैसेही आलेत.
- रमेश शिंत्रे,
झेंडू उत्पादक शेतकरी

लागवड केलेले शेतकरी
उमाजी सरगर, रमेश शिंत्रे, अभिजित देशमुख, प्रमोद धायगुडे, शहाजी यमगर, रावसाहेब देशमुख, विजय पारेकर, अरविंद पारेकर, अविनाश शिंदे, मारुती डोंबाळे.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli news merigold cultivation on hivtad