सांगलीत दुग्धजन्य पदार्थांकडे अन्न-औषधची डोळेझाक

रवींद्र माने
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

तासगाव - तासगाव तालुक्‍यातील डोर्ली येथील कृत्रिम दुधाच्या कारखान्याचा पर्दाफाश झाल्यानंतर आता तालुक्‍यातील दुग्धजन्य पदार्थ आणि बेकरी पदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांनाही अन्न आणि औषध  प्रशासनाने ‘स्वच्छते’चे धडे शिकवावेत, अशी मागणी होत आहे. अशा डेअऱ्यांमधून तयार होणारी उत्पादने ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत.

तासगाव - तासगाव तालुक्‍यातील डोर्ली येथील कृत्रिम दुधाच्या कारखान्याचा पर्दाफाश झाल्यानंतर आता तालुक्‍यातील दुग्धजन्य पदार्थ आणि बेकरी पदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांनाही अन्न आणि औषध  प्रशासनाने ‘स्वच्छते’चे धडे शिकवावेत, अशी मागणी होत आहे. अशा डेअऱ्यांमधून तयार होणारी उत्पादने ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत.

दुग्धजन्य पदार्थ जसे की खवा, बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड, पेढे यासारखे पदार्थ बनविण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे नियम आहेत. अशा पदार्थांचा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंध असल्याने हे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशी सर्वसामान्य ग्राहकांची माफक अपेक्षा असते. मात्र सध्या तासगावातील काही डेअऱ्यांमधून कोणताही विधिनिषेध न बाळगता असे पदार्थ बनविण्याचे काम सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून या डेअऱ्यांची आणि बेकरी पदार्थ तयार केले जाणाऱ्या भट्ट्यांची तपासणी केली जाते की नाही असा प्रश्‍न पडू लागला आहे.

सारे नियम कायदे धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याशी दररोज खेळ खेळला  जात आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर अन्न आणि  औषध प्रशासन जागे होणार काय, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. 

डेअरी आहे का उकीरडा? असा प्रश्‍न पडावा अशा परिस्थितीत डेअरी उत्पादने तयार केली जातात. जेथे दूध उतरून घेतले जाते तेथेच बाजूला भट्टी, तेथेच फ्रीज तेथेच दुधाचे कॅन, तेथेच पॅकिंग अशा स्थितीत पसरलेल्या प्रचंड दुर्गंधी पसरलेल्या परिस्थितीतच दुधापासून खवा, श्रीखंड, आम्रखंड बनविले जातात  आणि त्याची विक्री केली जाते.

अक्षरशः त्या ठिकाणी गेल्यास प्रचंड दुर्गंधीने उलटी येईल की काय अशा परिस्थित कामगार काम करत असतात. विशेष म्हणजे हे सारे पहात ग्राहक ते पदार्थ खरेदी करत असतात. हे पाहिल्यावर नक्‍की अन्न आणि औषध प्रशासन विभाग करतो काय ? असा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही. अन्न आणि औषध प्रशासनाकडून आवश्‍यक ते परवाने तरी घेतले आहेत की नाही ? अशा ठिकाणची तपासणी केली जाते का ? नियम पाळले जात नसल्यास काय कारवाई केली जाते ? याबाबत सारा आनंदीआनंदच आहे. वर्षानुवर्षे या डेअऱ्यांमधून ग्राहकांच्या आरोग्याशी  खेळले जात असताना याची जबाबदारी कोणावर हा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. 

तपासणीच नाही 
अस्वच्छ अशा परिस्थितीत तयार केले जाणारे पदार्थ किती आरोग्यदायी असतील याची कल्पनाच केलेली बरी. या पदार्थांमध्ये दुधाच्या स्निग्धांशाचे प्रमाण किती आणि त्यामध्ये मिसळलेल्या डालड्याचे प्रमाण किती? याची कधी तपासणीही होत नाही. काही डेअऱ्यांमधून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांवर केवळ डेअरीच्या नावाव्यतिरिक्‍त तयार कोणतीही नोंद आढळत नाही.

Web Title: sangli news Milk and milk product adulteration