दुधाला दरासाठी सरकारी कार्यालयात जनावरे सोडण्याचा इशारा

संतोष भिसे
शुक्रवार, 29 जून 2018

मिरज - गाईच्या दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने आज सुभाषनगर ( ता. मिरज ) येथे आंदोलन केले. गाई सोबत घेऊन रस्त्यावर ठाण मांडले. "आमच्या दुधाला भाव द्या अन्यथा आमची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी" अशा घोषणा लिहिलेले फलक गाईंच्या गळ्यांत अडकवले होते.

मिरज - गाईच्या दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने आज सुभाषनगर ( ता. मिरज ) येथे आंदोलन केले. गाई सोबत घेऊन रस्त्यावर ठाण मांडले. "आमच्या दुधाला भाव द्या अन्यथा आमची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी" अशा घोषणा लिहिलेले फलक गाईंच्या गळ्यांत अडकवले होते.

संघटनेचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य महादेव कोरे यांच्यासह माणिक माळी, कलमेश्‍वर कांबळे, सुरेश आंबी, इसाक सौदागर, मारुती माळी, गुंडू जतकर, नानासाहेब काणे, प्रदीप कोरे, नायकू माळी, मल्लिकार्जून बिराजदार, राजू पाटोळे, सुनिल आंबी, शशिकांत गायकवाड, गोटू आंबी, महादेव पाटील, बाबु हारगे, रावसाहेब चौगुले, बाबुराव चौगुले, शशिकांत गस्ते, शशिकात गायकवाड, अरुण क्षीरसागर आदींनी भाग घेताल.

कोरे म्हणाले, गाई पाळण्यासाठी दूध संघांनी प्रोत्साहन दिले. फायदा होईपर्यंत दूध घेतले; आता भुकटीचे दर उतरल्याचे कारण सांगत दूध नाकारत आहेत. गोकुळ संघाची ही भूमिका स्वार्थी आणि शेतकऱ्यांना संकटात ढकलणारी आहे.

राज्यभरातील सर्वच संघांनी गोकुळचा कित्ता गिरवला आहे; शासन मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आपल्याला शेतकऱ्यांबद्दल कणव नाही हे सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. दुधाचे दर सतरा रुपयांपर्यंत खाली आणल्याने शेतकऱ्यांना गाई सांभाळणे जिकिरीचे ठरत आहे. मराठवाड्यात दुष्काळ व कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करतात; आता पश्‍चिम महाराष्ट्रारात दुधाच्या संकटामुळे शेतकरी आत्महत्या करण्याची भिती आहे. 

आंदोलकांनी आंबेडकर चौकात गाईंसह ठिय्या मारला. गोकूळ संघ आणि सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सरकारने हस्तक्षेप करुन संघांवर दबाव टाकावा, गाईचे दूध स्विकारण्यास भाग पाडावे, प्रसंगी दुधाला अनुदान द्यावे, अन्यथा गाई व अन्य जनावरे सरकारी कार्यालयांत सोडल्याविना राहणार नाही असा इशारा कोरे यांनी दिला. 

पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांवर संकट
संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक माळी म्हणाले, ऐन पेरणीच्या हंगामात दुधाचे दर कमी करुन शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्याचे कारस्थान सुरु आहे.

Web Title: Sangli News Milk rate issue agitation