बारावी गुणपत्रिकेत चुकाच चुका

सुयोग घाटगे
बुधवार, 13 जून 2018

कोल्हापूर - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०१७-२०१८ च्या बारावी परीक्षार्थींच्या गुणपत्रिका वाटपामध्ये गोंधळ घातला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे गुणपत्रिकांअभावी भविष्यच टांगणीला लागले आहे. विभागीय मंडळातच सुमारे २० शाळांनी गुणपत्रिका वाटपात घोळ असल्याची तक्रार केली आहे.

कोल्हापूर - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०१७-२०१८ च्या बारावी परीक्षार्थींच्या गुणपत्रिका वाटपामध्ये गोंधळ घातला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे गुणपत्रिकांअभावी भविष्यच टांगणीला लागले आहे. विभागीय मंडळातच सुमारे २० शाळांनी गुणपत्रिका वाटपात घोळ असल्याची तक्रार केली आहे. यात एका शाळेची गुणपत्रिका दुसऱ्या शाळेला, काही गुणपत्रिका लॅमिनेशन नाही; तर काहींवर अध्यक्षांची सहीच नसल्यामुळे छपाईतील दोष समोर आले आहेत.

बारावीच्या गुणपत्रिकेंचे आज वाटप झाले. विद्यालयांनी गुणपत्रिकेचे गट्ठे केंद्रातून ताब्यात घेतल्यानंतर गुणपत्रिका कमी असल्याचे लक्षात आले. मंडळाकडे विचारणा केली असता ही चूक प्रिंटिंग व वितरण विभागाची असल्याचे सांगितले.
कोल्हापूर विभागांतर्गत अनेक कॉलेजचे निकाल दुसऱ्या कॉलेजला तर काही शाळांचे निकालच आले नसल्याचे समोर आले आहे. गुणपत्रिकांचे कटिंगदेखील चुकीचे झाले आहे.

इचलकरंजी येथील गोविंदराव हायस्कूलची पटसंख्या १४३ आहे. येथे एकही गुणपत्रिका मिळालेली नाही. यशवंतराव माध्यमिक विद्यालय सोळांकूर येथील १०० गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. डी.के.टी.ई. इचलकरंजी येथील ५० गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. देवचंद कॉलेजला ३९ गुणपत्रिकेपैकी एकही मिळाली नाही. पन्हाळा व्हॅली बोरपाडळे येथील एक गुणपत्रिका मिळालेली नाही. कासारवाडी हायस्कूलच्या दोन गुणपत्रिका मिरज येथील केंद्रावर मिळाल्या. 

गुणपत्रिका ताब्यात घेतल्यानंतर विद्यार्थी संख्येनुसार गुणपत्रिका नसल्याचे लक्षात आले. चौकशी केली असता प्रेसमधून चूक झाली आहे. आम्ही काही करू शकत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
- अविनाश खडके.
शिक्षक

१०० विद्यार्थ्यांची गुणपत्रिकाच नाही. नेमके विद्यार्थी आणि पालकांना उत्तर काय देणार हा प्रश्न आहे. शिक्षण मंडळाने याची त्वरित दखल घेऊन गुणपत्रिका उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
- एस. व्ही. पाटील,
शिक्षक

गुणपत्रिकेत दोष असल्याचे लक्षात आले आहे. किती ठिकाणी आणि कोणकोणत्या केंद्रांवर अशा गुणपत्रिका गेल्या आहेत, याची माहिती घेत आहोत. माहिती संकलनानंतर याची माहिती राज्य मंडळाला देऊन दोष निवारण करण्यात येईल.
- टी. एल. मोळे,
प्रभारी विभागीय सचिव

Web Title: Sangli News mistakes in HSC Mark sheet