सावकाराच्या भीतीने गाव सोडले !

महादेव अहिर
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

वाळवा - खासगी सावकाराच्या तगाद्याने वाळवा येथील एका मुस्लिम समाजातील कुटुंबाने गाव सोडले आहे. पोलिसांकडे दाद मागायला गेल्यावर ‘न्याय’ राहिला बाजूलाच; पण सावकारालाच ‘अमूक इतके’ पैसे देऊन विषय मिटवून टाक, असा ‘सल्ला’ त्यांनी दिला! ‘ते’ राहिलेले पैसेही देण्याची ऐपत नसल्याने जिवाच्या भीतीने या कुटुंबावर गाव सोडण्याची वेळ आली आहे.

शेतमजुरी आणि गवंड्याच्या हाताखाली काम करून पोट भरणाऱ्या एकाने अडचण आल्याने वाळवा येथील खासगी सावकाराकडून ३ वर्षांपूर्वी १० टक्के व्याजदराने ३५ हजार रुपये घेतले. नंतर तीन वर्षे दर महिन्याला व्याजाची रक्कम तो संबंधित सावकाराला देत राहिला. व्याजापोटी त्याने आतापर्यंत सावकाराला सुमारे सव्वा लाख रुपये दिले आहेत. मधल्या काळात दोन महिने कामाअभावी उत्पन्न नसल्याने दोन महिने व्याज देता आले नाही. त्यावेळी संबंधित सावकाराने त्याच्यावर दबाव आणला. दमदाटी केली.

प्रसंगी त्याची जागा बळकावण्याची धमकी दिली. त्याला घाबरून त्या गरिबाने आष्ट्याचे पोलिस ठाणे गाठले. तक्रारीचा लेखी अर्ज दिला. त्याच्याकडील दोन्ही अर्ज ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याला माघारी धाडले. तो बसस्थानकावर पोचेपर्यंत संबंधित सावकार पोलिस ठाण्यात हजर झाला. अर्थात पोलिसांनीच त्याला पाचारण केले होते. ठाण्यातील ‘साहेबांनी’ दोघांना समोरासमोर घेत चर्चा केली. ‘सावकाराला २० हजार दे आणि संपूर्ण प्रकरण मिटवून टाक’, असा सल्ला दिला

इतकी रक्कम देण्याची ऐपत नसतानाही सावकार आणि पोलिस यांच्या भीतीने पैसे देण्याच्या अटीवर त्याने मान हलवली; पण पुन्हा वास्तवात हे पैसेच देऊ शकत नसल्याने संबंधित व्यक्ती दहशतीखाली आहे. सावकाराला घाबरून त्याने गाव सोडले आहे. पत्नी आणि पाच वर्षे वयाच्या मुलासोबत इस्लामपुरात कचरे गल्लीत भाड्याच्या घरात तो राहातो. तिथेही येऊन त्याने दम दिलेला आहे. न्याय मिळावा या अपेक्षेने ज्या पोलिसांकडे जावे त्यांच्याकडूनच पैसे देण्याचा ‘सल्ला’ आल्याने न्याय कुणाकडे मागावा? अशा पेचात हे कुटुंब अडकले आहे.

Web Title: Sangli News money lender panic issue